आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. या ४८ जागांचं विभाजन काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशा तीन पक्षांत करायचं आहे. परंतु, अनेक जागांवर तिन्ही पक्षांचे उमेदवार निवडणूक लढवू इच्छितात. त्यामुळे जागावाटपाचा मोठा तिढा निर्माण झाला आहे. राज्य पातळीवरील हे वाद राज्यांतर्गत सोडवले जावेत, असा निर्णय इंडिया आघाडीने घेतला आहे. तसंच, इतर अनेक पक्षही महाविकास आघाडीत येण्याची संधी शोधत आहेत. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान, जागा वाटपाबाबत ठाकरे गटाने मांडलेला प्रस्ताव काँग्रेसने फेटाळला असल्याचं वृत्त समोर येतंय. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
लोकसभा निवडणुकीकरता ठाकरे गटाने २३ जागांची मागणी केली होती. परंतु, काँग्रेसने ही मागणी अमान्य केली आहे. यासंदर्भात नुकतीस महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत ठाकरे गटाने २३ जागांची मागणी केली होती. परंतु, ही मागणी आता फेटाळून लावण्यात आली आहे.
“शिवसेनेची दोन गटांत विभागणी झाली असून ठाकरे गटाने ४८ पैकी २३ जागांची मागणी केली होती. परंतु, त्यांच्यातील बरेच सदस्य एकनाथ शिंदे गटाकडे आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडे पुरेसे उमेदवार नसल्याने त्यांच्यापुढे मोठं आव्हान आहे”, असं संजय निरुपम यांनी म्हटलं असल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिलं. तसंच, “महाविकास आघाडीतील नेत्यांनी जागावाटपाबाबत संघर्ष टाळावा. ठाकरे गट २३ जागांची मागणी करू शकतं. पण या जागांचं ते काय करणार? शिवसेनेतील अनेक नेते एकनाथ शिंदे गटात आहेत. त्यामुळे उमेदवारी देण्याबाबत ठाकरे गटातच मोठं आव्हान निर्माण झालं आहे”, असंही निरूपम म्हणाले.
२३ जागांची मागणी परिस्थितीनुसार नाही
महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली आहे. त्यामुळे स्थिर मतांचा एकमेव जुना पक्ष आता काँग्रेस आहे, असं महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. तर, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण म्हणाले की, पक्षांमध्ये चर्चेची गरज आहे. प्रत्येक पक्षाला जास्त जागांची इच्छा असली तरी, शिवसेनेची २३ जागांची मागणी सध्याच्या परिस्थितीनुसार जास्त आहे.
ठाकरेंनी घेतलेली काँग्रेस हायकमांडची भेट
दरम्यान, काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीची बैठक दिल्लीत झाली होती. या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेऊन जागा वाटपासंदर्भात चर्चा केली होती, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं होतं. परंतु, काँग्रेस आणि राष्ट्रवादी किती जागा लढवणार याबाबत राऊत यांनी काहीही स्पष्ट केले नव्हते.
२०१९ मध्ये, अविभाजित शिवसेना भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीचा भाग होती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष आता महाविकास आघाडीचा भाग आहे. या आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाही समावेश आहे. जून २०२२ मध्ये, एकनाथ शिंदे आणि इतर ४० आमदारांनी शिवसेना नेतृत्वाविरुद्ध बंड केले. यामुळे, पक्षात फूट पडली आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA) सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करून राज्यात सरकार स्थापन केले.