Vasant More Resign MNS: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातले बडे नेते अशी ओळख असलेले वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. वसंत मोरे यांनी फेसबुकवर एक फोटो पोस्ट केला आणि त्यांनी राजीनामा दिला आहे. राज ठाकरेंच्या फोटो समोर ते उभे आहेत, त्यांनी हात जोडले आहेत साहेब मला माफ करा असं वसंत मोरे म्हणत आहेत आणि त्यांनी आपण मनसे सोडल्याचं जाहीर केलं आहे. माझ्या नाराजीचा कडेलोट झाला त्यामुळे मी आता पक्ष सोडला आहे. माझ्याविरोधात सातत्याने काही गोष्टी पसरवल्या जात होत्या. तसंच त्या गोष्टींची शहानिशा न करता मला निष्ठा सिद्ध करावी लागत होती. मी फक्त अग्निपरीक्षाच देणं बाकी होतं असंही वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.
वसंत मोरेंची मध्यरात्रीची फेसबुक पोस्ट!
“एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो.” ही पोस्ट वसंत मोरेंनी लिहिली आहे. शहराध्यक्ष पदावरुन काढल्यानंतर वसंत मोरे यांची नाराजी वाढली होती. तसंच रुपाली पाटील यांनीही भाऊ तुम्ही आमच्याबरोबर या असं म्हटलं होतं. मात्र वेळोवेळी मी मनसेसह आहे हे सांगत होते आणि ते मनसेबरोबरच राहिले. मात्र मध्यरात्री त्यांनी जी पोस्ट केली त्यानंतर ते पक्ष सोडणार अशा चर्चा रंगल्या होत्या, ही पोस्ट केल्यानंतर १३ व्या तासाला त्यांनी पक्ष सोडला आहे.
राज ठाकरेंना मोठा धक्का
वसंत मोरे हे पुण्यातले मनसेचे धडाडीचे नेते होते, त्यांनी आता पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. ते कुठल्या पक्षात जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दोन दिवसांत आपण भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एखादी समस्या आली, कुठे काही अन्याय होताना दिसला तर त्या ठिकाणी हजर राहून ते लोकांच्या अन्यायाला, समस्येला वाचा फोडतात हे बऱ्याचदा दिसून आलं होतं.. लोकांमध्ये ते याचमुळे प्रसिद्ध झाले. इतरांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वसंत मोरेंना पक्षात कुणाचा त्रास होतो आहे? त्यांची ही खदखद अशी का बाहेर येते आहे? हे प्रश्न आता त्यांच्या फेसबुक पोस्टमुळे उपस्थित होत होते. आता त्यांनी आपल्या पक्षाला आणि राज ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. लोकसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलेलं असताना वसंत मोरेंनी पक्ष सोडणं हा राज ठाकरेंसाठी धक्का मानला जातो आहे.
वसंत मोरेंनी पत्रात काय म्हटलं आहे?
मा. राज ठाकरे,
संस्थापक अध्यक्ष,
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
विषय : माझा पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि सर्व पदांचा राजीनामा स्वीकारणेसंदर्भात
आपणांस सप्रेम जय महाराष्ट्र!
पक्षाच्या स्थापनेपासून किंबहुना त्या आधीपासून मी पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा प्रयत्न माझ्या परिने करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली १८ वर्षे सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात मी कार्यरत राहिलो. मात्र अलिककडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण आणि पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो. त्यांना ताकद देतो, त्या सहकाऱ्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कोंडी करण्याचे तंत्र अवलंबले जात आहे. त्यामुळे मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती.
धन्यवाद
आपला विश्वासू
वसंत मोरे
असं पत्रक लिहित वसंत मोरेंनी राज ठाकरेंकडे आपल्या मनातलं म्हणणं मांडलं आहे आणि पक्षाला तसंच राज ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे.
मी फक्त अग्निपरीक्षाच द्यायची राहिली होती
“पक्षामध्ये अंतर्गत अनेक गोष्टी आहेत. पुणे शहरांतून लोकसभा लढवण्यासाठी मी इच्छुक होतो. माझ्याबाबत वारंवार नकारात्मक गोष्टी राज ठाकरेंपर्यंत पोहचवल्या गेल्या. त्यामधून कुठलीही शहानिशा न करता माझ्यावर आरोप केले गेले. वसंत मोरे स्वकेंद्रीत राजकारण करतो असेही आरोप केले गेले. वास्तविक मी हे कधीही केलं नाही. जे काही केलं ते पक्षहितासाठीच केलं. माझ्यावर, माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले. त्यामुळे आता माझ्यापुढे काही पर्याय राहिला नव्हता. मी कुठल्या पक्षात जाणार काय निर्णय घेणार हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट करेन. मी मनसे सोडली आहे, सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. तसंच सदस्यत्वही सोडलं आहे. संघटनेत मी नाही. माझी पुढची भूमिका येत्या दोन दिवसांत स्पष्ट करेन. लोकसभा लढवण्याचा निर्णयही मी येत्या काही दिवसांत जाहीर करेन. मी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. मनसेकडून माझ्याबाबत नकारात्मक गोष्टी पसरवल्या गेल्या. मी लोकसभेसाठी इच्छुक आहेच. कुठलीही शहानिशा न करता माझ्याबद्दल काही निर्णय घेतले गेले. मला आता पक्षाच्या कुठल्याच गोष्टींत रस राहिलेला नाही. मी राजीनामा दिला आहे. जे काही लोक आहेत त्यांनी निवडणूक लढवावी. मी आत्तापर्यंत कितीवेळा सांगितलं की पक्षनिष्ठ आहे, एकनिष्ठ आहे? मी अग्निपरीक्षा द्यायचीच राहिली आहे. राज ठाकरेंशी माझा कुठलाच वाद नाही. पुण्यात माझ्या विरोधात राजकारण होतं आहे त्याला कंटाळून मी राजीनामा दिला आहे.”