राजापूर : कोकणामध्ये मोठा प्रकल्प आणण्याचा आपला मानस आहे. पण तसे करताना स्थानिक भूमीपूत्रांना विश्वासात घेणे गरजेचे आहे, या भूमिकेचा राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी पुनरुच्चार केला. गेले दोन दिवस ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. सोमवारी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ठिकाणी भेट देऊन नियोजित प्रकल्पांची माहिती घेतली. तसेच काही योजनांचे भूमीपूजन केले. मंगळवारी त्यांनी राजापूरमार्गे रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा सुरू केला. या तालुक्यातील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पामुळे सध्या वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर काही स्थानिक संघटना आणि नागरिकांनी प्रकल्पाच्या समर्थनार्थ फलक हातात धरून तरुणांना रोजगारासाठी तो सुरू करण्याची मागणी केली. यावर त्यांच्याशी या विषयावर संवाद साधताना ठाकरे म्हणाले की, प्रकल्प उभारणी करताना आपल्या होकारासह भूमीपूत्रांच्या प्राधान्याने विचार करणार आहोत. या प्रकल्पाच्या माध्यमातून भूमीपूत्रांना नोकऱ्या, महिलांना रोजगार मिळण्याला प्राधान्य मिळणे गरजेचे आहे. या साऱ्यासंबंधित स्थानिकांसह भूमीपुत्रांशी चर्चा करण्याची सूचना संबंधित कंपनीला देण्यात आल्या आहेत. साऱ्यांना विश्वासात घेवून, चर्चा करून प्रकल्प उभारणीचा निर्णय घेण्यात येणार आहे. सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रकारांशी बोलतानाही त्यांनी हीच भूमिका मांडली होती.
या वेळी प्रकल्प समर्थकांनी ‘धोपेश्वर रिफायनरी झालीच पाहिजे’ अशी जोरदार घोषणाबाजी केली, तर महिलांनी ठाकरे यांचे स्वागत करताना ‘सरकार तुम्ही दाद घ्या ना.. रिफायनरी राजापूरला द्या ना’ या काव्यपंक्तीच्या माध्यमातून त्यांचे लक्ष वेधले. या वेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह मोठय़ा संख्येने महिला उपस्थित होत्या. राजापूरवासीयांसह रिफायनरी समर्थकांनी ठाकरे यांची येथील शासकीय विश्रामगृहातही भेट घेतली.