कर्नाटक शासनाने मराठीजनांवर अन्याय करत बेळगावमध्ये विधानसभेचे अधिवेशन घेतानाच त्याला त्याच ताकदीने विरोध करत मराठी बांधवांनी आज महामेळाव्यातून उत्तर दिले. कर्नाटक शासन मराठी भाषकांवर करीत असलेल्या अन्यायाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाबरोबरच रस्त्यावरील लढाई ताकदीने जारी ठेवण्याचा निर्धार बुधवारी बेळगाव येथे झालेल्या मराठी भाषकांच्या महामेळाव्यात करण्यात आला. सीमा लढय़ाची ताकद वाढविण्यासाठी मराठी भाषकांची एकजूट कायम ठेवण्याचा संकल्पही या वेळी करण्यात आला.
बेळगावात नव्याने बांधलेल्या विधानसौधमध्ये बुधवारपासून कर्नाटक शासनाचे अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी आणि याद्वारे कर्नाटक शासन मराठी भाषकांवरील कन्नड सक्तीचे धोरण पुढे राबवत असल्याच्या निषेधार्थ आज सीमा भागातील मराठी भाषकांनी महामेळाव्याचे आयोजन केले होते. लेले मैदानात झालेल्या महामेळाव्यास मराठी भाषकांची प्रचंड उपस्थिती होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे महामेळाव्याच्या स्थळाला नाव देण्यात आले होते. सीमा लढय़ाचे ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या हस्ते महामेळाव्यास प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजीमहाराज, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या महामेळाव्यात तीन ठराव मंजूर करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न प्रलंबित असताना विधानसौध बांधून मराठी भाषकांवर अन्याय करीत असल्याचा निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात आला. सीमा भागात मराठी माणूस बहुभाषक असताना त्याला घटनात्मक अधिकारापासून वंचित ठेवण्याऱ्या कर्नाटक शासनाचा निषेध करण्यात आला. तसेच येळ्ळूर येथे महाराष्ट्र राज्य नावाच्या फलकाची नासधूस करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध करण्यात येऊन या घटनेत सहभागी असलेल्यांवर कारवाई करावी, या फलकाजवळ बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, असा ठराव संमत करण्यात आला.
एन. डी. पाटील यांनी सीमा लढय़ाचा आढावा घेऊन ती लढाई आगामी काळातही जोमाने चालू ठेवण्याचे आवाहन केले. न्यायालयात मराठी माणसांची बाजू मांडत राहत असतानाच रस्त्यांवरील आंदोलनही कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आमदार के. पी. पाटील यांनी शरद पवार यांनी या प्रश्नात लक्ष घातल्याने तो नजीकच्या काळात सुटेल, असा आशावाद व्यक्त केला. माजी आमदार नरसिंग पाटील यांनी सीमा भागातील कर्नाटक शासनाने अन्याय चालविला असून, त्याला उत्तर देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी ठामपणे उभे राहण्याची गरज व्यक्त केली. सांगलीचे शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब काटकर यांनी शिवसेना व उद्धव ठाकरे यांचा सीमावासीयांना सदैव पाठिंबा राहील, असे नमूद केले. स्वागत मध्यवर्ती समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले. प्रास्ताविक माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले. दीपक दळवी यांनी सूत्रसंचालन केले. मेळाव्यास माजी आमदार दिगंबर पाटील, वसंतराव पाटील, शिंगोजीराव हुद्दार, शिवसेनेचे संघटक प्रकाश शिरोळकर, मराठी भाषक युवा आघाडीचे अध्यक्ष माजी महापौर संभाजी पाटील, टी. के. पाटील, बी. आय. पाटील, शिवाजी घुणकर, राजीव मरवे यांच्यासह सीमा भागातील मराठी भाषक उपस्थित होते.
कन्नडिगांच्या अधिवेशनास महामेळाव्याने उत्तर
कर्नाटक शासनाने मराठीजनांवर अन्याय करत बेळगावमध्ये विधानसभेचे अधिवेशन घेतानाच त्याला त्याच ताकदीने विरोध करत मराठी बांधवांनी आज महामेळाव्यातून उत्तर दिले. कर्नाटक शासन मराठी भाषकांवर करीत असलेल्या अन्यायाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाबरोबरच रस्त्यावरील लढाई ताकदीने जारी ठेवण्याचा निर्धार बुधवारी बेळगाव येथे झालेल्या मराठी भाषकांच्या महामेळाव्यात करण्यात आला. सीमा लढय़ाची ताकद वाढविण्यासाठी मराठी भाषकांची एकजूट
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-12-2012 at 06:03 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big rally is the answer to kannadians conference