नागपूरमध्ये राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. देशमुख यांच्या ताब्यातील नगरखेडा पंचायत समितीवर भाजपने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे राज्यातील बहुतांश ठिकाणी सत्ताधारी महाविकासआघाडीला चांगलं यश मिळालं आहे. मात्र, अनिल देशमुख यांच्या बालेकिल्ल्यातच भाजपने सुरुंग लावलाय. याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
राज्यात सत्तेवर असताना आणि महाविकासआघाडीच्या रुपात तिन्ही पक्ष एकत्र असल्यानं ताकद वाढलेल्या स्थितीतही राष्ट्रवादी काँग्रेसला नगरखेडा पंचायत समितीतील सत्ता टिकवता आलेली नाही. राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या या पंचायत समितीत भाजपने विजय मिळवल्यानं हा अनिल देशमुख यांना धक्का मानला जातोय. विशेष म्हणजे ईडीचा ससेमिरा मागे लागल्यानं अनिल देशमुख काही दिवसांपासून बेपत्ता आहेत. याचा थेट फटका राष्ट्रवादीला बसल्याचं दिसत आहे. नगरखेडा पंचायत समितीतील यशानंतर भाजप कार्यकर्त्यांचा विजयी जल्लोष पाहायला मिळतोय.
अनिल देशमुखांच्या मतदारसंघातही राष्ट्रवादीने २ जागा गमावल्या
अनिल देशमुख यांच्या काटोल विधानसभा मतदारसंघात देखील राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागलाय. भाजपने सावरगाव आणि पारडसिंगा या दोन्ही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला परभवाची धूळ चारलीय. त्यामुळे हा देखील अनिल देशमुखांसाठी मोठा धक्का मानला जातोय. सावरगावमध्ये भाजपच्या पार्वती काळबांडे विजयी झाल्या. त्यांनी 334 मतांनी विरोधी उमेदवाराचा पराभव केला. पारडसिंगामध्ये भाजपच्या मीनाक्षी सरोदे यांनी विजय मिळवला.
नागपूरमध्ये एकूण जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी पोटनिवडणूक झाली. त्यापैकी भाजपने ३ जागांवर विजय मिळवला, तर राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागांवर विजय मिळवता आला. विशेष म्हणजे काँग्रेसने इथं दमदार कामगिरी करत ९ जागा जिंकल्यात. शिवसेनेला मात्र नागपुरात खातंही खोलता आलेलं नाही. विशेष म्हणजे शेकापचाही एका जागेवर विजय झालाय.
जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत कोणाला किती जागा?
जिल्हा | भाजप | शिवसेना | राष्ट्रवादी | काँग्रेस | इतर | निकाल जाहीर | एकूण जागा |
अकोला | १ | १ | २ | १ | ९ | १४ | १४ |
धुळे | ८ | २ | ३ | २ | ० | १५ | १५ |
नंदूरबार | ४ | ३ | १ | ३ | ० | ११ | ११ |
नागपूर | ३ | ० | २ | ९ | २ | १६ | १६ |
पालघर | ५ | ५ | ४ | ० | १ | १५ | १५ |
वाशिम | २ | १ | ५ | २ | ४ | १४ | १४ |
एकूण | २३ | १२ | १७ | १७ | १६ | ८५ | ८५ |
जिल्हानिहाय जिल्हा परिषदेच्या जागा
नागपूर – १६
धुळे – १५
अकोला – १४
वाशिम – १४
नंदूरबार – ११
पालघर – ०२
जिल्ह्यानिहाय पंचायत समिती जागा
नागपूर – ३१
धुळे – ३०
अकोला – २८
वाशिम – २७
नंदूरबार – १४
पालघर – १४