राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे व प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी त्यांच्या पक्षाच्या सर्व पदे व सदस्यांचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या समवेत अजित पवार गटामध्ये असणाऱ्या सर्व नागवडे समर्थक कार्यकर्त्यांनी देखील राजीनामे दिले आहे. यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगर जिल्ह्यामध्ये अजित पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वीच या पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी देखील पदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर पुन्हा आता महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष यांनी राजीनामा दिला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते शिवाजीराव नागवडे यांचे पुत्र राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे यांनी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामध्ये प्रवेश केला होता. अनुराधा नागवडे या जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका देखील आहेत. काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या देखील त्या जिल्हाध्यक्ष होत्या. विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी त्यांना उमेदवारी देण्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र महायुतीकडून आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर झाली. यामुळे नागवडे यांनी अजित पवार यांची साथ सोडली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी येथे नागवडे समर्थकांचा रविवारी रात्री भव्य मेळावा झाला आणि या मेळाव्यामध्ये सर्व समर्थकांच्या भूमिकेमुळे नागवडे यांनी अजित पवार यांची साथ सोडली आहे.

हेही वाचा – मविआचं अखेर ठरलं! जागावाटपाबाबत नाना पटोलेंनी जाहीर केला मुहूर्त; म्हणाले, “आम्ही तिघं…”

मागील आठवड्यातच शरद पवार तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस पक्षाचे नाना पटोले यांच्या भेटी घेऊन महाविकास आघाडीकडून उमेदवारीची मागणी नागवडे केली होती. त्यामुळे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे.

हेही वाचा – मुद्रा लोनच्या नावाखाली सातशे महिलांना २५ लाखांस गंडविले, सोलापुरात भामट्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जाणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. या दोन्ही पक्षांनी या जागेवर आपला हक्क सांगितला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून प्रवेश करून मशाल या चिन्हावर उमेदवारी करण्याची पूर्ण तयारी अनुराधा नागवडे यांनी केले आहे . तर शरद पवार यांच्या पक्षाकडून माजी आमदार राहुल जगताप हे देखील प्रबळ दावेदार आहेत. यामुळे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोज नाट्यमय घडामोडी घडत असल्याचे दिसून येते.