‘टेकू’च्या साहाय्याने सत्तेत जाण्याची वेळ शिवसेना-भाजपवर पुन्हा एकदा आली असतानाच ‘शिवसेनेचे नाक’ म्हणून ओळख असणाऱ्या गुलमंडीच्या वॉर्डात खासदार चंद्रकांत खैरे यांना त्यांचे पुतणे सचिन खैरे यांना निवडून आणता आले नाही. गुलमंडीतून राजू तनवाणी यांनी १६० मतांनी विजय मिळविला. खासदार खैरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. एवढी की पालकमंत्री रामदास कदम यांच्यासह बडय़ा नेत्यांनी या वॉर्डात सभादेखील घेतली होती. राजू तनवाणी यांचा विजय माजी आमदार किशनचंद तनवाणी यांचा असल्याचे मानले जाते. या विजयानंतर गुलमंडी भागात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. शिवसेनेची गडही गेला आणि सिंहही गेला, अशी अवस्था या निवडणुकीत दिसून आली.
खासदार खैरे यांनी तीन जागा प्रतिष्ठेच्या केल्या होत्या, अशी शिवसैनिकांमध्ये चर्चा होती. खासदारपुत्र हृषीकेश यांचा समर्थनगर वॉर्ड, पुतण्याचा गुलमंडी आणि तत्कालीन महापौर कला ओझा यांचा बाळकृष्णनगर वॉर्ड यासाठी त्यांनी खास रणनीती आखली होती. या तिन्ही जागा याव्यात, यासाठी कमालीचा आटापिटा केला होता, मात्र यापैकी केवळ पुत्र हृषीकेश खैरे ८७९ मतांनी विजयी झाले. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे डॉ. पवन डोंगरे यांना त्यांनी पराभूत केले. मात्र, खैरे यांना त्यांचे निवासस्थान ज्या भागात आहे, तोच भाग राखता आला नाही. गुलमंडी भागात माजी आमदार किशनचंद तनवाणी आणि खासदार खैरे या दोघांची घरे आहेत. गेली अनेक वर्षे दोघांनी शिवसेनेत राजकारण केले, मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी किशनचंद तनवाणी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि गुलमंडीत त्यांच्या भावाने बंडखोरी केली. सचिन खैरे यांना या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची १ हजार ४७७ मते मिळाली.
याच वॉर्डात आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे बंडखोर शिवसैनिक पप्पू व्यास यांना १ हजार ९९८ मते मिळाली. या वॉर्डातून शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्न केले, मात्र उमेदवारी मिळाली नाही म्हणून दरवेळी बंडखोरीही केली. या पाश्र्वभूमीवर खासदार खैरे यांच्यासमोर मोठे आव्हान होते. शिवसेनेचा गड मानला जाणारा गुलमंडीचा भाग अपक्ष राजू तनवाणींच्या हाती लागला आहे.महापौर कला ओझा, माजी महापौर अनिता घोडेले यांना पराभवाचा धक्का
महापालिकेच्या निवडणुकीत काही पराभव शिवसेनेला मान खाली घालावयास लावणारे ठरले. महापौर कला ओझा यांच्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यावरून शिवसेनेत बरीच चर्चा सुरू होती. त्यांना उमेदवारी मिळावी, यासाठी युतीच्या जागेमध्येही कसरत करून बाळकृष्णनगरचा वॉर्ड त्यांच्यासाठी सोडवून घेण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात ओझा यांचा पराभव झाला. त्यांना तिसऱ्या क्रमांकाची (८१६ मते) मते मिळाली. ज्योती राजाराम मोरे (१ हजार २३८ मते) यांनी त्यांचा पराभव केला.
बंडखोरीमुळे या वॉर्डात पराभव झाल्याचा खैरेसमर्थकांचा दावा आहे. या वॉर्डात भाजपच्या बंडखोर संगीता उमाकांत रत्नपारखी रिंगणात होत्या. त्यांना ९७१ मते मिळाली. महापौरपदाच्या कारकीर्दीत त्यांनी एकही महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची आठवण शिवसैनिकांनादेखील नाही. राज्य सरकार व बडय़ा नेत्यांनी दिलेल्या निधीतून हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे काम आपल्याच महापौरपदाच्या कारकीर्दीत झाले, असे जाहीर करून त्याचे श्रेय स्वत:हूनच घेतले होते. प्रत्येक वेळी निर्णय घेताना कच खाणारी व्यक्ती अशी ओळख बनल्याने ओझा यांची कारकीर्द वादग्रस्तच ठरली. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेतही त्यांना बऱ्यापैकी विरोध होता, मात्र खासदार खैरे यांनी त्यांना पूर्ण समर्थन दिल्याने त्या निवडून याव्यात, यासाठीही त्यांनीच प्रयत्न केले. मात्र, वॉर्डात वेगवेगळय़ा ७ उमेदवारांनाही चांगली मते मिळाली. केवळ जयश्री खाडे या एकमेव उमेदवाराला ३७ मते मिळाली अन्यथा अन्य उमेदवारांना ५०हून अधिक मते मिळाली. या वॉर्डात ४० व्यक्तींनी उमेदवार लायक नसल्याचा ‘नोटा’ही वापरला.
याच पाच वर्षांच्या कालावधीत अनिता घोडेले याही महापौर होत्या. सत्तेला टेकू देत त्यांनी केलेली कारकीर्द काहीशी बरी होती, असे सांगितले जाते. तथापि, त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसपुरस्कृत उमेदवार विमल कांबळे यांनी त्यांना पराभूत केले. शेजार-शेजारच्या दोन वॉर्डामध्ये अनिता घोडेले व त्यांचे पती नंदकुमार घोडेले उभे होते. काँग्रेस पुरस्कृत ज. ना. कांबळे व त्यांच्या पत्नी त्यांच्याविरोधात होत्या.

Story img Loader