महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील बदलतं राजकारण आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठं विधान केलं आहे. तसेच त्यांची राजकीय दिशा काय असेल याचंही सुतोवाच केलं आहे. ते दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर असून गुरुवारी (१३ जुलै) रत्नागिरीतील चिपळून येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, “आपण आपला विचार लोकांपर्यंत का पोहचवायचं म्हणत आहोत. पदाधिकाऱ्यांनी एकमेकांशी पदानुसार बोलण्यापेक्षा मनाने एकमेकांशी बोलणं गरजेचं आहे. आज चिपळूणमध्ये शाखेचं उद्घाटन झालं. इथे अविनाश जाधव, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई ही सगळी मंडळी येऊन गेली. जोरदार कामाला सुरुवात झाली आहे.”
“मला तडजोड करावी लागली, तर मी घरात बसेन”
“एखाद्या पदावर बसल्यावर काम झालं पाहिजे. पक्ष सांगेल ते काम करावं लागेल, अन्यथा पदावर राहता येणार नाही. मला तडजोड करावी लागली, तर मी घरात बसेन, तडजोड करणार नाही. राज्यात जो व्यभिचार सुरू आहे, तो मी करणार नाही,” असं महत्त्वाचं विधान राज ठाकरेंनी केलं.
हेही वाचा : Video: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे का? संजय राऊत म्हणाले, “अनेक दगडांवर पाय ठेऊन…”
“लोकसभेची निवडणूक का लढवायची?”
लोकसभेची निवडणूक का लढवायची असा सवालही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना केला. सद्यपरिस्थितीवर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “मी १५ दिवसात मेळावा घेणार आहे. त्यातच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करेन. मेळाव्याच्या माध्यमातून माझ्या मनातील संताप बाहेर काढणार आहे.”