कर्जत तालुक्यात भीमा नदीपात्रामध्ये पोलीस पथकाची वाळूमाफियांवर आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई शनिवारी पहाटे चार वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील, कर्जतचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी केली. या वेळी श्रीगोंदेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सानप व जामखेडचे पोलीस निरीक्षक वाखारे नगर, येथील शीघ्र कृती दल यांचा मोठा ताफा घेऊन ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत वाळूमाफियांच्या अनेक शोषपंपासह असलेल्या १५ बोटी व ७ फायबर बोटी, वाळू वाहणा-या ५ मालमोटारी, एक जेसीबी असा सुमारे दीड कोटीचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईमुळे वाळूमाफियांचे कंबरडे मोडले आहे. संबंधित वाळूमाफियावंर गुन्हेही दाखल करण्यात येणार आहेत.
भीमा नदीपात्रात खेड, सिद्धटेक, बेर्डी, गणेशवाडी, भांबोरा, जलालपूर या परिसरात अहोरात्र वाळूचा बेकायदेशीर वाळूउपसा सुरू आहे. महसूल विभागाने कारवाई केल्यानंतरही लगेचच पुन्हा बेकायदेशीर उपसा सुरू होतो. कर्जत व दौंड तालुक्यांच्या सरहद्दीचा गैरफायदा घेत हा उद्योग सुरू आहे. या वाळूमाफियांवर कारवाई करण्याचे धाडसी पाऊल जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी उचलले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली फक्त पोलीस विभागाने आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील व कर्जतचे पोलीस निरीक्षक प्रताप इगंळे यांनी कारवाई करण्यासाठी सर्व योजना आखली, त्यांच्या मदतीसाठी नगर येथून खास शीघ्र कृतिदलाची एक तुकडी व श्रीगोंदे व जामखेडचे पोलीस निरीक्षक व काही उपनिरीक्षक आणि तब्बल ७० पोलीस कर्मचारी असा प्रचंड मोठा ताफा नदीपात्राजवळ पहाटे चार वाजता पोहोचला. त्यांनी चार तुकडय़ा करून एकाच वेळी सर्वांना घेरून ही कारवाई केली.
देवगडला प्रवरापात्रातून ९ ट्रॅक्टर जप्त
नेवासे तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड परिसरातील वाळूतस्करांवर पोलिसांनी धडक कारवाई करून तीन ठिकाणांहून वाळूतस्करी करणा-या ९ ट्रॅक्टर व एक मालमोटार असा सुमारे लाखो रुपयांचा माल जप्त केला. विशेष म्हणजे कारवाईनंतर महसूल खात्याने नदीकाठी चर खोदले.
नेवासे तालुका वाळूतस्करी व गुन्हेगारीमुळे बदनाम झाला आहे. महसूल खात्याकडून वाळूतस्करांवर कारवाई केली जात नाही उलट अभय दिले जाते. अधिकारी व तस्करांमध्ये आर्थिक हितसंबंध आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस वाळूतस्करांच्या कारवाया वाढल्या आहेत. एक मोठे रॅकेट तस्करीत गुंतले आहे. सध्या देवगडसारख्या धार्मिक क्षेत्राच्या परिसरात मोठी वाळूतस्करी चालू आहे. या ठिकाणी औरंगाबाद व नेवासे भागातील वाळूतस्करांच्या दोन गटांमध्ये नेहमीच वाद व हाणामा-या चालू असतात. त्यामुळे परिसरात नागरिकांमध्य़े भीतीचे वातावरण आहे. मात्र पोलिसांनी आता वाळूतस्करांविरुद्ध मोहीम उघडली आहे.
नेवासे पोलिसांनी देवगड परिसरातील प्रवरापात्रात वाळू चोरी करणा-यांवर छापे घातले. प्रवरा नदीपात्रात ७ ट्रॅक्टर जप्त करण्यात पोलिसांना यश आले. तर बकुपिंपळगाव रस्त्यावर १ मालमोटार पकडण्यात आली. तसेच खुपटी परिसरात दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले. यावरील दोन चालक ताब्यात घेतले आहेत. पकडण्यात आलेल्या ९ पैकी ५ ट्रॅक्टर विनानंबर आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या फ़िर्यादीवरून तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारवाईत निरीक्षक सुरेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक एस. जी. जोशी, ढाकणे, बाबा लबडे, सुनील शिरसाठ, योगेश भिंगारदिवे, बाळासाहेब नागरगोजे, दादा गरड आदी पोलीस सहभागी होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा