केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ पक्षाचे नाव व ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह शिंदे गटाला दिलं. यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर उभारला आहे. त्यातच ठाकरे गटाला अलीकडेच देण्यात आलेल्या ‘मशाल’ चिन्हावर समता पार्टीने दावा केला आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. मशाल चिन्हावर समता पार्टीने दावा केला असून याबाबत आम्ही सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहोत, असं समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी सांगितले.
शिवसेनेचा जो काही अंतर्गत वाद होता; तो आता निकालात निघाला आहे. पक्षाचं चिन्ह व पक्षाचे नाव हे शिंदे गटाला मिळालं. त्यामुळे आमचं चिन्ह का अडकवून ठेवलय? असा सवाल मंडल यांनी उपस्थित केला. आमचं चिन्ह इतर कोणत्या पक्षाला देऊ नका. आमचं चिन्ह आम्हालाच मिळालं पाहिजे. यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. शिवसेनेचा अंतर्गत वाद सुरू असताना २०२२ मध्ये आम्हाला हे चिन्ह मिळाले होते, असंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा- “…तर मी मरून जाईल, मला श्रद्धांजली वाहावी लागेल”, अजित पवार असं का म्हणाले?
समता पार्टी ही बिहारमधील एक मोठी पार्टी आहे. मशाल चिन्हावरून समता पार्टीची ओळख आहे. निवडणूक आयोगाकडून ही चूक कशी झाली. चिन्ह घेताना शिवसेना नेत्यांना याबाबत कल्पना नव्हती का? त्यांनी जाणूनबुजून असं केलं का? असा सवालही मंडल यांनी उपस्थित केला. उदय मंडल यांनी आम्ही धनुष्यबाण व शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांना जरी मिळाला असता तरी त्यांचे देखील अभिनंदन केलं असते. आम्हाला शिवसेनेच्या अंतर्गत वादाशी काही देणंघेणं नाही. आम्हाला आमचं ‘मशाल’ चिन्ह हवंय.
आरोप करण्यापलीकडे राऊतांकडे काहीच उरलं नाही- उदय मंडल
“काल संजय राऊतांचं एक विधान मी ऐकलं. ते आम्हाला खोके पार्टी म्हणाले. त्यामुळे मी संजय राऊतांना सांगू इच्छित आहे की, त्यांच्याकडे आता खोकेही उरले नाहीत. त्यांच्या खालून मुख्यमंत्र्यांची खुर्ची एकनाथ शिंदे उचलून घेऊन गेले. हे लोक फक्त पाहात राहिले. ते आता पार्टी आणि पक्षचिन्हही घेऊन गेले आहेत. आता सगळंच एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलं आहे. त्यामुळे यांच्याकडे आता काय शिल्लक राहिलं आहे? हे समता पार्टीला खोके पार्टी म्हणाले. पण यांच्याकडे खोकेही नाहीत”, अशी टीका उदय मंडल यांनी केली.