शहरातील सलीम अली सरोवराचे सुशोभीकरण करण्यात आले असून, पक्षी निरीक्षणासाठी तेथे मोठी दुर्बीण उपलब्ध झाली आहे. तसेच मनोराही उभारण्यात आला आहे. महापालिकेने सरोवरासाठी प्रतिव्यक्ती दहा रुपये शुल्क आकारणी करण्याचे ठरविले आहे. सरोवरात बोटिंग करण्याचा प्रस्तावही होता. मात्र, त्यास पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी विरोध केला. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत बुधवारी या प्रकल्पाचे लोकार्पण झाले.
सलीम अली सरोवर सुशोभीकरणासाठी मराठवाडा विकास कार्यक्रमातून निधी देण्यात आला. अंदाजे ५ कोटी २५ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. आतापर्यंत ४ कोटी २५ लाख रुपये खर्च झाले असल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी दिली. सरोवरातील गाळ काढण्यात आला असून पक्षी निरीक्षणासाठी मनोरा उभारण्यात आला आहे. सुशोभीकरणही लक्षणीय असल्याने शहरात येणाऱ्या पर्यटकांनाही पक्षी निरीक्षण करता येईल, अशी सोय निर्माण झाल्याचा दावा खासदार खैरे यांनी केला. सहलीच्या निमित्ताने येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसाठी शुल्कात सवलत देण्याची सूचनाही खैरे यांनी केली.
सुशोभीकरण झाल्यामुळे सरोवरात बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होती. मात्र, असे केल्यास पक्षी निरीक्षणाच्या मूळ उद्देशालाच फाटा बसेल. त्यामुळे बोटिंगला विरोध असल्याचे पक्षीमित्र दिलीप यार्दी यांनी सांगितले. केवळ एवढेच नाही, तर सरोवर परिसरात खाद्यपदार्थाची विक्री केली जाऊ नये, अशी सूचनाही करण्यात आली. या उपक्रमासाठी मराठवाडा विकास कार्यक्रमातून ५० टक्के, तर महापालिकेचा ५० टक्के निधी उपलब्ध करण्यात आला.

Story img Loader