सुहास बिऱ्हाडे

शहरातील कचऱ्याच्या समस्येवर महापालिकेचा उपाय; प्रयोगाची आयुक्तांकडून पाहणी

शहरातील कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रयोगातील अनेक अपयशानंतर आता वसई-विरार महापालिकेने कचरा कचराभूमीत नेण्याऐवजी त्यापासून जैवइंधन  तयार करण्यासाठी अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी घरच्या घरी जैवइंधन तयार करणारा एक प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला जाणार आहे. गुरुवारी आयुक्तांनी या जैवइंधन प्रयोगाची अधिकाऱ्यांसह पाहणी केली.

वसई-विरार शहर महापालिका हद्दीत दररोज सुमारे ७०० मेट्रीक टन  कचरा जमा होतो. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वसई पुर्वेच्या गोखिवरे येथील ११ हेक्टर जागेवर पालिकेची कचराभूमी आहे. या कचराभूमीत हा कचरा आणून टाकला जातो. मात्र दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण आणि अपुरी जागा यामुळे कचरा समस्या उग्र होत आहे. यासाठी कचऱ्यावरील प्रयोग हाती घेण्यात आले होते, मात्र त्यात पालिकेला यश आलेले नाही.

सध्या शहरात ठिकठिकाणी कचऱ्यामुळे  होणारी दुर्गंधी निर्माण झाली आहे. यात कचऱ्याला लागणाऱ्या आगी, पावसात कचराभूमीतून निघणारे दुषित पाणी यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. कचरा टाकायला आणखीन जागा आणायची कुठून असा मोठा प्रश्न पालिकेसमोर निर्माण झाला आहे.  घनकचरा व्यवस्थापनाचे धोरण मंजूर नसल्याने पालिकेचा घनकचरा प्रकल्प रखडलेला आहे. या कचऱ्यापासून विजनिर्मीती करण्याच्या पालिकेच्या प्रयत्नांना यश आले नाही. वीज निर्मितीसाठी दोनदा निविदा काढूनही एकही कंत्राटदार पुढे आला नाही. त्यामुळे आता रोज साठणाऱ्या कचऱ्याचे करायचे काय, असा प्रश्न पडला आहे. कचराभूमीत एवढा कचरा जमा झालेला आहे की पालिकेच्या गाडय़ाही आत जाऊ शकत नाही. यामुळे आता कचराभूमीत अधिक कचरा येऊ न देणे यासाठी पालिका प्रयत्न करणार आहे.

घरच्या घरी जैवइंधन

कचऱ्याची समस्या सोडवायची असेल तर कचराभूमीत कचरा न नेणे हा एक पर्याय आहे, असे पालिकेचे मत आहे. यासाठी आता इमारतीच्या आवारातच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यावर भर दिला जाणार आहे. मोठय़ा रहिवाशी संकुलांना ओला आणि सुका कचऱ्यापासून खतनिर्मिती करणे पालिकेने बंधनकारक केले होते. आता इमारतीच्या आवारात तसेच घरातील कचऱ्यापासून  जैवइंधन (बायोगॅस) तयार करण्यावर पालिका भर देणार आहे. वसईतील होली फॅमिली कॉन्व्हेंट या निवासी शाळेत जैवइंधनाचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. गुरुवारी पालिका आयुक्त बी. जी. पवार यांनी या शाळेला दिली.

तर जैवइंधन प्रकल्प शहरभर

रोज तयार होणारा कचरा या जैवइंधनाच्या टाकीत टाकल्यानंतर त्यापासून स्वयंपाकाचा गॅस तसेच द्रवरूपी खत तयार होत आहे. जैवइंधनाची टाकी एकदा बसवली की त्या पुन्हा दुरूस्ती किंवा देखभाल करायची गरज नसते. त्यात कचरा टाकला की तयार होणारा स्वयंपाकाचा गॅस हा नळी लावून वापरता येतो. तसेच उत्तम दर्जाचे नैसर्गिक खत तयार होते. त्याला कुठल्याही प्रकारचा दपही येत नाही. आयुक्तांनी घरच्या घरी जैवइंधन तयार करण्याचा पर्याय पालिकेमार्फत  प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही या जैवइंधनाची पाहणी केली आहे. कचऱ्याची घरच्या घरी विल्हेवाट लावण्यासाठी हा अत्यंत उपयुक्त असा पर्याय असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. आम्ही प्रायोगिक तत्त्वावर हा जैवइंधनचा प्रकल्प राबविणार आहोत. त्याच्या सकारात्मक परिणामानंतर तो शहरात अन्यत्र वापरता येईल, असेही ते म्हणाले.