सोलापूर : सोलापुरात छत्रपती संभाजी कंबर तलाव आणि किल्ला बाग परिसरात कावळ्यांसह घारी व बदकाच्या मृत्यूचे कारण हे ‘बर्ड फ्लू’असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने बाधित परिसरात रासायनिक फवारणीसह अन्य उपाययोजना हाती घेतल्या आहेत. संबंधित तिन्ही भागांत नागरिकांना वावर करण्यास २१ दिवसांसाठी प्रतिबंध करण्यात आला आहे.
गेल्या ९ मार्च रोजी छत्रपती संभाजी तलाव आणि किल्ला बाग परिसरात मिळून नऊ कावळे, दोन घारी आणि एका बदकाचा मृत्यू झाला होता. ही घटना संशयास्पद असल्यामुळे मृत पक्ष्यांचे शवविच्छेदन करण्यात येऊन त्यांचे एकूण ३४ नमुने रासायनिक पृथक्करणासाठी भोपाळ येथील इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीज लॅबोरेटरी या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यात सर्व पक्ष्यांना ‘बर्ड फ्लू’ची (एस-५ एन-१) लागण झाली होते, हे निष्पन्न झाले आहे. याबाबतची अधिकृत माहिती सोलापूर महानगरपालिकेतील पशू शल्यचिकित्सक डॉ. सतीश चौगुले आणि जिल्हा पशुवैद्यकीय सहायक आयुक्त डॉ. भास्कर पराडे यांनी दिली. मृत पक्ष्यांना तीन फुटांपेक्षा जास्त खोल खड्डा करून पुरण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील बाधित परिसरातील ‘बर्ड फ्लू’चा प्रादुर्भाव इतरत्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे गृहीत धरून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचे आदेश दिले आहेत. छत्रपती संभाजी कंबर तलाव परिसर, किल्लाबाग परिसर आणि लगतचा सिद्धेश्वर तलाव परिसर अशा दहा किलोमीटर त्रिज्येचा संपूर्ण परिसर सतर्क भाग म्हणून घोषित करण्यात आला आहे. या संपूर्ण भागात पक्ष्यांचे सर्वेक्षण केले जात आहे. यात पक्षी व पक्ष्यांच्या वाहतुकीसह नागरिकांना वावर करण्यास पुढील २१ दिवसांसाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे. बाधित परिसरात दोन टक्के हायपोक्लोराईड किंवा पोटॅशिअम परमँगनेट रासायनिक द्रव्यांची फवारणी करून निर्जंतुकीकरण केले जात आहे. बाधित दहा किलोमीटर परिसरातील पक्ष्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे नमुने रासायनिक पृथक्करणासाठी पाठविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
या बाधित क्षेत्रात प्रतिबंधक उपाययोजनांची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांना आवश्यकतेनुसार महापालिका, पोलीस, महसूल, जलसंपदा, ग्रामविकास, परिवहन आदी विभागांचे मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री उपलब्ध करण्यास सांगितले गेले आहे. जिल्हा पशुवैद्यकीय सहायक आयुक्त डॉ. भास्कर पराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण बाधित परिसरातील घरगुती पालन करण्यात येणाऱ्या कोंबड्यांसह अन्य पक्ष्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे नमुने भोपाळच्या इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीज लॅबोरेटरीला पाठविले जाणार आहेत.