सोलापूर : सोलापुरात छत्रपती संभाजी तलाव आणि किल्ला बाग परिसरात कावळे, घारी, बदकांना बर्ड फ्ल्यूची बाधा झाल्याचे आढळून आल्यानंतर तेथे बर्ड फ्ल्यू प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी हाती घेतलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे सक्त आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान बाधित एक किलोमीटर परिघातील ७४ नमुने आणि दहा किलोमीटर परिघातील १२६ नमुने घेऊन रासायनिक तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. दरम्यान या बाधित भागात सुरू असलेल्या चिकन विक्री दुकानांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत त्यावर तातडीने निर्बंध घालण्याचे आदेश दिले आहेत.

सोलापुरात छत्रपती संभाजी तलाव आणि किल्ला बाग परिसरात कावळे, घारी, बदकांना बर्ड फ्ल्यूची बाधा झाल्याचे नुकतेच आढळून आले. यानंतर प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणा सतर्क होत त्यांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. या भागात नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. बाधित दहा किलोमीटर परिसरात कुक्कुटपालन केंद्रांसह घरगुती पालन होणाऱ्या कोंबड्यांचे नमुने घेऊन रासायनिक तपासणीसाठी पाठविण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार बाधित एक किलोमीटर परिघातील ७४ नमुने आणि दहा किलोमीटर परिघातील १२६ नमुने घेऊन रासायनिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल येत्या एक-दोन दिवसांत प्राप्त होण्याची अपेक्षा असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

दरम्यान बाधित भागात चिकन विक्री दुकाने सुरूच असून आणि चिकन खाद्य पदार्थ विक्रीही खुलेआम होत असल्याचे दिसून आल्याने त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत तातडीने प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आदेश दिले आहेत.