|| अनिकेत साठे

हजारो पक्ष्यांच्या अधिवासाचे पाणथळ क्षेत्र संरक्षित होणार

महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाणारे नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य लवकरच ‘रामसार’ या यादीत समाविष्ट होणार आहे. या यादीत देशातील २६ पाणथळ क्षेत्रांचा समावेश आहे. त्यात राज्यातील एकही क्षेत्र नव्हते. नांदुरमध्यमेश्वरला आंतरराष्ट्रीय मानांकन मिळाल्यानंतर पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे पाणथळ क्षेत्र अधिक संरक्षित होण्यास हातभार लागणार आहे.

तापमानाचा पारा खाली उतरत असताना या अभयारण्यात सध्या २० हजारहून अधिक परदेशी, स्वदेशी पक्ष्यांचे आगमन झाले आहे. विशेष म्हणजे, त्यामध्ये रोहित पक्ष्यांचा आकडा पहिल्यांदाच ७०० वर पोहोचल्याचे वन्यजीव विभागाचे निरीक्षण आहे.

गोदावरी, कादवा नदीच्या संगमावरील नांदुरमध्यमेश्वर बंधारा परिसर पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. वर्षांनुवर्षे नदीच्या प्रवाहात गाळ साचल्याने मातीचे उंचवटे तयार झाले. जलाशयातील उथळ पाणी, विपुल जलचर, विविध पाणवनस्पती, वृक्षराई, सभोवतालची शेती ही पोषक स्थिती पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासास उपयुक्त ठरली. परिसरात २४० हून अधिक प्रकारचे पक्षी आढळतात. चारशेपेक्षा अधिक वनस्पतींची विविधता असणाऱ्या या भागात पक्ष्यांबरोबर कोल्हे, मुंगूस, लांडगे, बिबटय़ा, साप, कासव आदी वन्यचर आहेत. जलाशयात २४ प्रकारचे मासे आहेत. यामुळे गारवा वाढला की, अभयारण्यात पक्ष्यांची अक्षरश: जत्रा भरते. यंदाही हजारो परदेशी पक्षी दाखल झाले आहेत. पक्ष्यांचा अधिवास, जैवविविधता, पक्षीवास्तव्य, स्थलांतर आदींबाबत शास्त्रोक्त अभ्यास, अधिकृत नोंदी घेऊन पक्षीसूची तयार करण्यात आली आहे. पक्ष्यांच्या अधिवासाची संपन्नता, विविधता, दुर्मीळ, धोक्यात आलेल्या महत्त्वाच्या पक्ष्यांचे अस्तित्व आदींमुळे हे क्षेत्र आधीच भारतीय पक्षीतीर्थ जाळ्यात अंतर्भूत आहे. आता हे अभयारण्य आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणार असल्याकडे वन्यजीव विभाग लक्ष वेधत आहेत.

‘रामसार’च्या यादीत समाविष्ट होण्यासाठी काही निकष असतात. अभयारण्यात दर वर्षी २० हजारांहून अधिक पक्ष्यांचे आगमन होणे, हा मुख्य निकष पूर्ण करण्यात आल्याचे वन्यजीव विभागाचे अधिकारी भरत शिंदे यांनी सांगितले. ब्रिटिशकालीन नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्याची पाणी साठवणक्षमता कमी आहे. अन्य धरणांमधून येणारे पाणी या बंधाऱ्यातून पुढे सोडले जाते. यामुळे पाण्याची पातळी कमी-अधिक होते. जलाशयालगतचे गवत, वृक्षराईत अनेक जातींच्या स्थानिक, स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास आहे. आजवरच्या इतिहासात या वर्षी प्रथमच मोठय़ा संख्येने रोहित दाखल झाल्याचे शिंदे यांनी नमूद केले. ‘रामसार’च्या पाणथळ क्षेत्रांच्या यादीत नांदुरमध्यमेश्वर अभयारण्याला स्थान मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर पक्षी अभ्यास, संशोधनाला चालना मिळणार आहे.

दाखल झालेले देशी-विदेशी पक्षी

  • अभयारण्यात सैबेरिया, उत्तर कोरिया, अफ्रिका, युरोप आदी ठिकाणांहून पक्ष्यांचे आगमन झाले आहे. त्यात रोहित, करकोचा, तरंग, थापटय़ा, पांढरा बलाक, मालगुजा, भिवई बदक आदींचा समावेश आहे.
  • कुलंग, चमचा, दलदल हरिण, हरियल, जांभळा बगळा, चतुरंग, राखी बगळा, राखी धनेश, मोर शराटी, कांडे करकोचा, रंगीत करकोचा, चक्रांग यांच्यासह इतर नानाविध प्रकार येथे पाहावयास मिळतात.

मानांकनाने काय साधणार?

  • ‘रामसार’चे मानांकन लाभल्यास नांदुरमध्यमेश्वर अभयारण्याचा खऱ्या अर्थाने विकास होईल.
  • पाणथळ क्षेत्र संरक्षित होईल. आंतरराष्ट्रीय पातळीवरून संवर्धन, विकासासाठी निधी मिळेल आणि त्यावर देखरेख, नियंत्रणही राहील.
  • वन विभागाकडे निधी नसल्याने फारशी कामे होत नाहीत. सध्या हे अभयारण्य राज्य आणि देशापुरतेच मर्यादित आहे. रामसारच्या यादीत समाविष्ट झाल्यानंतर ते आंतरराष्ट्रीय पक्षीमित्र आणि अभ्यासकांपर्यंत पोहचेल.
  • त्यांच्यामार्फत अभ्यास होईल. स्थानिक पक्षीमित्रांनाही त्याचा लाभ होईल, याकडे नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष आनंद बोरा यांनी लक्ष वेधले आहे.

Story img Loader