सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पांग्रड येथे आंब्याचे पाणी नामक पक्षी निरीक्षक प्रकल्पाची सुरूवात करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील विवीध प्रकारच्या पक्षांचे निरिक्षण करण्याची संधी यामुळे पर्यटक आणि अभ्यासकांना मिळू लागली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे देशाविदेशातील पक्षीनिरीक्षक या ठिकाणी पक्षी निरीक्षणासाठी दाखल होऊ लागले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात निसर्ग सौंदर्य आणि विपुल प्रमाणात जैवविविधता असल्याने विविधांगी पक्षी आढळतात. जिल्ह्यात ४१९ प्रकारचे आढळणारे पक्षी दिसतात तर एकट्या सह्याद्रीच्या पट्ट्यात २४० पेक्षा जास्त प्रकारचे पक्षी पहायला मिळतात. जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने पायाभूत सुविधांची निर्मिती केली तर पक्षी निरीक्षण करणारे देश विदेशातील पर्यटक येऊ शकतात. कुडाळ तालुक्यातील पांग्रड पक्षी निरीक्षण कट्टा उभारण्यात आला आहे तेथे देशभरातील पक्षी निरीक्षण करणारे पर्यटक येऊ लागले आहेत.
या पक्षी निरीक्षण प्रकल्पात ४८ प्रकारचे पक्षी आढळून आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने तिबोटी खंड्या, राखी डोक्याचा बुलबुल, लाल कंठाचा बुलबुल, इंडियन स्किमीटार बॅब्लर , स्वर्गीय नर्तक, विसलिंग थ्रश, शामा, फुलवेटा अशा पक्षांचा समावेश आहे. पक्षी निरीक्षण करणारे सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक सुभाष पुराणिक, डॉ गणेश मर्गज, डॉ. मकरंद काजरेकर यांनी रविवारी जंगलातील उष्णता आणि पक्षी जीवन निरिक्षण केले.
वाढत्या उष्णतेमुळे पक्षी निरीक्षणाची संधी
वाढत्या उष्णतेमुळे पक्षी सध्या पाणवठ्यांच्या शोधात फिरत आहेत. उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी या पक्षी निरीक्षण प्रकल्पातील नैसर्गिक पाणवठ्यांवर येतात. तेथिल पाण्यात अंघोळ करून शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करतात. या पक्षांचे निरीक्षण करणे त्यांची छायाचित्र टीपणे ही एक विलक्षण संधी असते. यासाठी पक्षी निरीक्षण कट्टा उभारण्यात आला आहे, असे डॉ प्रा गणेश मर्गज यांनी बोलताना सांगितले. जंगल पर्यटन दूरदृष्टी गरजेची आहे. त्यामुळे असे पक्षी निरीक्षण प्रकल्प ठिकठिकाणी उभारता येऊ शकतील, ज्यामुळे कोकणातील जैवविवीधता पाहण्याची संधी मिळू शकेल, असे वन विभागाचे माजी सहाय्यक वनसंरक्षक सुभाष पुराणिक यांनी बोलताना सांगितले.