पंडित कुमार गंधर्व यांचे जन्मशताब्दी वर्ष येत्या शनिवारपासून (८ एप्रिल) देशभरात विविध स्वरमैफली आणि कार्यक्रमांनी सुरू होणार आहे. कोणताही कालखंड समजून घेण्यासाठी त्या काळातील सामाजिक- राजकीय- वैज्ञानिक आणि सांस्कृतिक अशा अनेक स्तरांवरील घडामोडी पाहणे आवश्यक असते. अंतराने अतिशय दूर असूनही एकाच वेळी विविध क्षेत्रांत समान विचार प्रकट होत असतात. त्यांचे एकमेकांवर कळत-नकळत झालेले परिणाम जाणवतात. एकाच काळात कार्यरत असलेल्या अनेक व्यक्ती आणि संस्थांमुळे समाजात झालेले बदल लक्षात येतात. यानिमित्ताने या गानतपस्वी कलावंताच्या कार्याचा संगीतदर्दी मुकुंद संगोराम यांनी घेतलेला वेध. तसेच १९२४ ते १९९२ या कुमार गंधर्व यांच्या कारकीर्दीच्या टप्प्यांवर जागतिक आणि देश पटलावरील महत्त्वपूर्ण घटनांवर लेखक-पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी टाकलेला दृष्टिक्षेप..

पं. कुमार गंधर्व यांना आपल्या बौद्धिक क्षमतांची पुरेपूर जाणीव होती. त्या क्षमता त्यांनी भारतीय संगीतासाठी उपयोगात आणल्या हे महत्त्वाचे. संगीताच्या परंपरांचे, त्या निर्माण होण्यामागील कारणांचे, त्यातील बारकाव्यांचे आणि सौंदर्यनिर्मितीचे रहस्य शोधण्यात त्यांना जो बौद्धिक आनंद मिळत होता, तो अतिशय सौंदर्यपूर्णतेने व्यक्त करत त्यांनी स्वत:बरोबर भारतीय संगीताच्या रसिकांना त्यात सहभागी करून घेतले. संगीतासारख्या प्रयोगशरण कलेमध्ये नावीन्याची ओढ असावी लागते. आपल्या प्रत्येक मैफलीत आपण काय नवे देऊ शकतो, यासाठीची त्यांची कलात्मक धडपड त्यांच्या असामान्यत्वाची ओळख पटवून देणारी होती. त्यामुळेच भारतीय स्वातंत्र्योत्तर काळावर आपली नाममुद्रा उमटवणाऱ्या हाताच्या बोटांवर मोजता येतील, अशा कलावंतांमध्ये कुमारजींचे स्थान अढळ राहिले आहे. त्यांच्या मृत्यूनंतर इतक्या वर्षांनीही त्यांच्या संगीताबद्दलचे आकर्षण वाढतेच आहे, याचे कारण काळाच्या पुढचे पाहण्याची त्यांची क्षमता. भारतीय संगीताकडे पाहण्याची वेगळी दृष्टी आणि ते सादर करण्यासाठी आवश्यक असलेले सौंदर्यभान, कुमारजींच्या आयुष्यभरातील संशोधनाचे आणि अभ्यासाचे फलित होते. सतत नावीन्याचा शोध घेण्याचे असामान्यत्व त्यांच्या ठायी होते. परंपरांचे भान ठेवत, त्यांचे नवनिर्माण करून ते प्रवाही करण्याचे त्यांच्या अंगी असलेले सामथ्र्य विलक्षण होते. रागसंगीताचे असे संशोधन करून त्याचा सौंदर्याविष्कार करण्यासाठीची त्यांची धडपड त्यांच्या चाहत्यांना सतत त्यांच्या कलेकडे खेचत राहिली.

centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
Saket Bridge, Mumbai Nashik Traffic, Road Widening,
मुंबई-नाशिक मार्गावर पुढील तीन महिने कोंडीचे, साकेत पुलाजवळील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास सुरूवात
What is the National Health Claim Exchange health insurance
आरोग्य विम्याची प्रक्रिया आता जलद? काय आहे ‘नॅशनल हेल्थ क्लेम एक्स्चेंज’?
mahayuti government first cabinet meeting held in mantralaya
विकासाची गती कायम ; देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; ‘लाडक्या बहिणीं’ना २१०० रुपयांसाठी अर्थसंकल्पापर्यंत प्रतीक्षा
q2 gdp growth estimate may be revised upwards nageswaran
दुसऱ्या तिमाहीतील ‘जीडीपी’त फेरउजळणीनंतर वाढ दिसणे शक्य -नागेश्वरन
only 600 objections and suggestions filed on thane development plan
ठाण्याचा विकास आराखडा निवडणुकांमुळे पडद्याआड? दोन महिन्यांत जेमतेम ६०० हरकती
Three generations perform on stage of Sawai Gandharva Bhimsen Festival
‘सवाई’च्या स्वरमंचावर तीन पिढ्यांचे सादरीकरण; महोत्सवात आश्वासक, बुजुर्ग कलाकारांचा सहभाग

प्रयोग करत राहणे, हे कोणत्याही प्रज्ञावंताचे लक्षण. कुमारजींनी असे प्रयोग करताना बुद्धी आणि मन यांची सुरेख सांगड घातली. नुसत्या चमत्कृतींनी समोरच्या श्रोत्यांना दिपवून टाकण्यापेक्षा त्याच्या अंतर्मनात सौंदर्याची आस निर्माण करण्यात त्यांना अधिक आनंद वाटत होता. त्यामुळेच आनंदाचा खळाळता झरा त्यांच्या संगीतातून वाहत राहिला. संगीत जीवनव्यापी असते आणि त्यात जगण्याचे प्रतिबिंब दिसते, याची जाणीव त्यांच्या अनेक सांगीतिक प्रयोगांमध्ये दिसते. माध्यान्ही देवीला बळी देण्यासाठी नेण्यात येत असलेल्या बकरीच्या मनातील घालमेल, स्वरांतून दाखवता येण्यासाठी परंपरागत संगीताच्याही पलीकडे जात नव्या स्वरावलींचा, लगावाचा आणि बंदिशीतील शब्दांचा विचार त्यांनी केला आणि त्यातून मधुसूरजासारख्या रागाची निर्मिती झाली. ‘बचा ले मोरी माँ’ हे शब्दही तो भाव व्यक्त करण्यासाठी त्यांनाच सुचू शकतात. भवतालाचे हे भान त्यांच्या निसर्गप्रेमात ओथंबून जेव्हा स्वरपूर्ण होते, तेव्हा ‘गीतवर्षां’, ‘गीत हेमंत’, ‘ऋतुराज मैफल’ यांसारख्या कार्यक्रमांची निर्मिती होते. पूर्वसुरींच्या कर्तृत्वाचा धांडोळा घेत गौडम् मल्हाराचे सुखद दर्शन होते आणि भूप रागातील विविधरंगी बंदिशींची किंवा कल्याण रागातील रंगोन्मेषी प्रकारांची अभ्यासपूर्ण, कलात्मक मांडणी करणारे ‘भूप दर्शन’, ‘कल्याण के प्रकार’ हे कार्यक्रमही सादर होतात. रागाकडे आणि त्याच्या स्वरमांडणीकडे वेगळय़ा नजरेने पाहू शकणाऱ्या कुमारजींना नव्या बंदिशींची निर्मिती करणे भाग पडले. त्यांच्या ‘अनूपरागविलास’ या ग्रंथातील त्यांनी रचलेल्या बंदिशी याची साक्ष आहेत. ख्म्याल संगीताच्या बरोबरीने निर्माण झालेल्या ठुमरी, टप्पा, तराणा, होरी, कजरी या ललित संगीत प्रकारांचा अभ्यास करताना, त्यांना जे नवे काही सापडले, ते इतके देखणे आणि सुंदर आहे, की त्याचे श्रवण हा आनंदाचा ठेवा बनतो. ख्यालानंतर येणारी द्रुत बंदिश गाऊन झाल्यानंतरही सांगायचे काही राहून जाते आणि ठुमरी समोर येते. ती गाऊन झाल्यानंतरही काही शिल्लक राहते, त्यातून टप्पा येतो आणि त्यातही काही राहतेच, म्हणून शब्दविरहित तराणा तयार होतो, हा त्यांचा विचार त्यांची संगीताकडे पाहण्याची वेगळी दृष्टी स्पष्ट करतो.परंपरांबद्दलच बोलायचे, तर सूरदास, तुलसीदास, मीरा, कबीर या संतांच्या बरोबरीने संत तुकाराम महाराजांच्या काव्याचा समग्र शोध घेण्यासाठीचा प्रचंड अभ्यास आणि त्याला स्वरांत बांधण्याची अद्भुत सर्जनशीलता, हा कुमारजींच्या सांगीतिक व्यक्तिमत्त्वाचा विशेष होता.

कलात्मकता हाच स्थायिभाव असल्यामुळे अजंठा- वेरूळच्या लेण्यांची भव्यता त्यांना जशी भावली, तशीच बालगंधर्वासारख्या कलावंताच्या गायकीतील सौंदर्यस्थळेही भावली. अभिजात संगीतातील फारच थोडे कलावंत आपल्या निर्मिती प्रक्रियेबद्दल तपशिलाने सांगू शकतात. कुमारजी त्यापैकी एक. वाशी येथील गांधर्व महाविद्यालयात झालेल्या संगीत गप्पांमधून त्यांनी व्यक्त केलेले विचार ‘मुक्काम वाशी’ या ग्रंथात समाविष्ट झाले आहेत. हा ग्रंथ कुमार गंधर्व यांच्या वैचारिक पार्श्वभूमीचे दर्शन घडवणारा ठरतो. दीर्घ परंपरा लाभलेल्या भारतीय अभिजात संगीताला सतत प्रवाही ठेवण्यात काळाच्या प्रत्येक टप्प्यावर असामान्य क्षमतेचे कलावंत निर्माण झाले. त्यांनी संगीतात नवचैतन्य आणले, ते पुढे नेण्यासाठी आपली सारी शक्ती पणाला लावली. आजही ते खळाळते राहण्यामागे कुमार गंधर्व यांच्यासारख्या प्रज्ञावंतांचे योगदान विसरता येणारे नक्कीच नाही. मानवी जीवनात संगीताचा प्रवेश झाला, तोच मुळी समूह गायनातून. त्याचे लोकसंगीत झाले. संगीताचे हे मूळ माळव्यातील लोकसंगीतात शोधणाऱ्या कुमारजींना त्यातही रागसंगीताचे दुवे सापडले. त्यातून रागनिर्मिती झाली, त्या लोकसंगीताचा अभिजात आविष्कार ‘मालवा की लोकधुनें’, ‘गीतवर्षां’, ‘ऋतुराजमैफल’ यांसारख्या कार्यक्रमातून झाला. याच लोकसंगीतातून आलेल्या भक्ती संगीतात कुमारजींना सर्जनाचे झरे सापडले. त्यातून निर्गुणी भजनांचे मळे फुलले. निर्गुणी हा त्यांच्या सांगीतिक कारकीर्दीतला एक अतिशय ठळक टप्पा. निर्गुणी भजनांचा त्यांनी निर्माण केलेला बाज आणि त्यांचा रागदारी संगीतातील आविष्कार या दोन्ही शैली वेगवेगळय़ा पातळय़ांवर ठेवण्याचे कसब त्यांना साध्य झाले होते. त्यामुळेच कुमारजींमध्ये दोन गायनशैलींचा पूर्ण विकास झाल्याचे पाहायला मिळते. निर्गुणीतले कुमारजी आणि राग संगीतातील कुमारजी ही दोन भिन्न रूपे आहेत. स्वराच्या लगावापासून ते त्याच्या मांडणीपर्यंत आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या भावापासून ते अभिजात तत्त्वांपर्यंत दोन स्वतंत्र कुमार गंधर्व पाहायला मिळतात.

हे दोन्ही अतिशय उच्च दर्जाची प्रतिभा असणारे कुमार गंधर्व रसिकांना मात्र एकत्रच भावले.
सर्वच कलांच्या क्षेत्रांत लोकोत्तर कलावंतांमध्ये निर्माण होणाऱ्या नवनिर्माणाच्या सर्जनाच्या कळा मानवी जीवन अनेक अंगांनी समृद्ध करत असतात. त्यातही अमूर्त असलेल्या संगीताने मानवी जीवनात निसर्गत: आलेल्या भावभावनांना केलेला परिसस्पर्श अधिक भावणारा. अमूर्ततेबरोबरच निर्मितीक्षणीच विरून जाण्याचा गुणधर्म अभिजात संगीताने धारण केला. कोणत्याही कलेच्या रसास्वादात सर्वात महत्त्वाचा प्रश्न ‘उरते काय?’ हा असायला हवा. संगीत असो, की चित्रकला, शिल्पकला असो की वाङ्मय, त्याच्या परिपूर्ण अनुभवानंतर शिल्लक काय राहते, यावर त्या कलाकृतीचे मोठेपण ठरते. कुमार गंधर्वाच्या संगीतातील नवसर्जनाने संगीताच्या अपूर्वतेचा साक्षात्कार घडवला आणि समज असणाऱ्या प्रत्येकाच्या जगण्याला त्यांचे संगीत अर्थ प्राप्त करून देणारे ठरले!

८ एप्रिल१९२४ : शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली ऊर्फ पं. कुमार गंधर्व यांचा सुळेभावी (कर्नाटक) येथे जन्म.

देशात

’महात्मा गांधी यांनी ‘नवजीवन प्रकाशना’च्या वतीने ‘दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाचा इतिहास’ हे पुस्तक प्रकाशित केले.
’रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितांचा कवी तेस्मोन हु यांनी चिनी भाषेत अनुवाद केला आणि टागोर यांना आमंत्रित केले.
’फ्रेंच लेखक व नाटककार रोमा रोलां यांनी शरदचंद्र चटोपाध्याय यांचा ‘जगातील उत्कृष्ट कादंबरीकार’ असे संबोधून गौरव केला.
’भारतीय नृत्यशैलीला जागतिक पातळीवर नेणारे नर्तक उदयशंकर आणि रशियन नर्तिका अॅना पावलोव्ह यांचे राधाकृष्ण नृत्यनाटय़ सादर.
’संगीतशास्त्रज्ञ व संगीतप्रसारक विष्णू नारायण भातखंडे यांनी संगीतविषयक वादसंवाद आणि संगीतप्रसार करण्यासाठी संगीत परिषदांचे आयोजन सुरू केले. त्यानुसार त्यांनी लखनऊ येथे परिषद भरवली. पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी १९०१ साली गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली होती. उस्ताद अल्लादिया खान, उस्ताद अल्लाउद्दीन खान, उस्ताद करीम खान, उस्ताद फैय्याज खान, ओंकारनाथ ठाकूर, केसरबाई केरकर, अंजनीबाई मालपेकर, मोगुबाई कुर्डीकर, गंगुबाई हनगळ, बा. र. देवधर व रामभाऊ कुंदगोळकर आदी गायक आणि त्यांचे शिष्य यांच्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीतामधील सुवर्णकाळ ठरला.

’मुन्शी प्रेमचंद यांनी ‘सरस्वती मुद्रणालय’ आरंभ करून त्यांची ‘रंगभूमी’ ही कादंबरी प्रसिद्ध केली.
जगात
’चार्ली चॅप्लिन यांच्या ‘गोल्ड रश’चे चित्रीकरण सुरू झाले.
’भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्र नाथ बोस यांनी ‘क्वांटम मेकॅनिक्स’ संबंधित सांख्यिकीय मॉडेल आणणाऱ्या शोधनिबंधाचे भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी जर्मन भाषेत अनुवाद केला.
’जागतिक व्यापार आणि उद्योगवाढीसाठी लंडनच्या वेम्बली पार्क येथे ब्रिटिश साम्राज्याचे प्रदर्शन.

२ ऑक्टोबर १९३५ : अलाहाबाद येथील संगीत सभेत कुमार गंधर्व यांचा प्रथम सहभाग.
देशात
’शांतिनिकेतन येथील शारदोत्सवातील नाटकात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी संन्याशाची भूमिका केली.
’शरदचंद्र चटोपाध्याय यांची ‘विप्रदास’ कादंबरी प्रसिद्ध. त्यांच्या कादंबरीवर आधारित दिग्दर्शक प्रथमेशचंद्र बारुआ यांचा ‘देवदास’ चित्रपट प्रकाशित. संगीत दिग्दर्शक तिमिर वरन यांनी चित्रपटात उस्ताद अब्दुल करीम खान यांनी गायलेल्या ठुमरीचा समावेश केला. जिला कुंदनलाल सहगल यांनी गायले होते. सगळी गाणी देशभर लोकप्रिय झाली.
’गांधीजींची वध्र्यापासून आठ किमी. अंतरावरील सेगाव गावात शेण, माती व बांबूतून कुटी असलेल्या आश्रमाची तयारी. गांधीजींनी चित्रकार नंदलाल बोस यांना लखनऊ येथील काँग्रेसचे पॅव्हेलियन साधेपणाने तयार करण्याची विनंती केली.
’डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ‘हिंदू धर्माचा त्याग करणार’ असल्याची नाशिक जिल्ह्यातील येवला येथील सभेत घोषणा.
’प्रेमचंद यांच्या ‘गोदान’ कादंबरीचे लेखन पूर्ण.
’लेखक मुल्कराज आनंद यांची ‘अस्पृश्य’ ही कादंबरी प्रसिद्ध.
’प्रभात फिल्म स्टुडिओने ‘संत तुकाराम’चे चित्रीकरण सुरू केले.
’आधुनिक चित्रकला भारतात आणणाऱ्या अमृता शेरगिल यांच्या ‘तीन मुली’ या चित्राची सर्वत्र वाखाणणी.

जगात
’बर्नार्ड शॉ यांच्या ‘पिग्मॅलीयन’ नाटकावर चित्रपट प्रदर्शित.
’चार्ली चॅप्लिन यांच्या ‘मॉडर्न टाइम्स’चे चित्रीकरण सुरू झाले.
’अमेरिकेतील अटलांटा येथे मार्टिन ल्युथर किंग हे शाळेत दाखल.

१४ ऑगस्ट १९४२ : गवालिया टँकवर महात्मा गांधींच्या उपस्थितीत ‘भारत छोडमे आंदोलना’च्या पहिल्या सभेत ‘स्कूल ऑफ इंडियन म्यूजिक’ च्या विद्यार्थ्यांसोबत ‘वंदे मातरम्’चे गायन.

देशात
’स्वातंत्र्यसैनिक उषा मेहता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ४२.८४ मीटरच्या तरंग लांबीवर गुप्त ट्रान्समीटरने काँग्रेस रेडिओ सुरू केला.
’चित्रकार, ‘बंगाल स्कूल ऑफ आर्ट’चे संस्थापक, भारतीय कलेतील स्वदेशी मूल्यांचे प्रतिपादक, अवनींद्रनाथ टागोर यांची विश्व-भारती विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती.
’‘छोडो भारत’ आंदोलनात देशभरातील चित्रकार, संगीतकार आणि नर्तक वसाहतवादी राजवटीविरुद्धच्या लढय़ात सामील झाले.
’शांतिनिकेतनमधील नंदलाल बोस व विनोदबिहारी मुखर्जी यांच्याकडील चित्रकलेचे शिक्षण पूर्ण करून सत्यजित राय यांचे कोलकात्यामध्ये आगमन.
’सादत हसन मंटो यांचे ‘जनाजे’ व ‘तीन औरते’ या आकाशवाणी नाटय़ांचे प्रसारण.

जगात
वास्तुशिल्पी लॉरी बेकर हे चीनमधील युद्धसैनिकांच्या शुश्रूषेसाठी ‘फ्रेंड्स अॅम्ब्युलन्स युनिट’ समवेत दाखल.
’जर्मनीचा रशियावर हल्ला.
’अमेरिकेमधील शिकागो येथे अणुबॉम्ब तयार करण्यासाठी ‘मॅनहटन प्रकल्प’ कार्यान्वित.

१ मार्च १९४६ : मुंबई येथील जिना हॉल मध्ये प्रथमच गायन.
देशात
’पं. जवाहरलाल नेहरू यांना म्यानमार, इंडोनेशिया, मलेशिया आदी आग्नेय आशियाई देशांतील नेत्यांकडून व्याख्यानाचे आमंत्रण.
’डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापलेल्या ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’कडून मुंबई येथे ‘सिद्धार्थ महाविद्यालया’चा आरंभ करण्याची तयारी पूर्ण.
’दिग्दर्शक चेतन आनंद यांच्या ‘नीचा नगर’ चित्रपटामुळे सामाजिक वास्तवतेचे प्रभावी चित्रण करणाऱ्या समांतर प्रवाहास आरंभ. फ्रान्स येथील ‘कान’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘नीचा नगर’ ला पुरस्कार आणि जागतिक पातळीवर स्तुतिसुमने. रशियन लेखक माक्सिम गॉर्की यांच्या ‘द लोअर देप्थ्स’ या कथेवर आधारित या चित्रपटाचे कथाकार हयातुल्ला अन्सारी, संवादलेखक ख्वाजा अहमद अब्बास, तर संगीतकार पं. रविशंकर यांचे होते. प्रमुख भूमिकेत रफिक अन्वर, उमा आनंद, कामिनी कौशल व झोहरा सहगल आदी कलाकार होते.
’दिग्दर्शक व्ही. शांताराम यांचा चित्रपट ‘डॉ. कोटणीस यांची अमर कहानी’ प्रदर्शित.
’‘प्रभात फिल्म स्टुडिओ’चे ‘आगे बढो’ आणि ‘हम एक है’ प्रदर्शित.

’गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांनी स्वातंत्र्य लढा आणि कस्तुरबा फाउंडेशनसाठी अनेक मैफिली केल्या.

जगात
’‘युनेस्को- युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अॅंड कल्चरल ऑर्गनायझेशन’च्या स्थापनेसाठी आयोगाचा प्रस्ताव तयार.
’दुसऱ्या महायुद्धावर अणुबॉम्बचे सावट पाहून अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या पुढाकारातून आण्विक शास्त्रज्ञांच्या आणीबाणी समितीची स्थापना झाली. जगातील नागरिकांना अण्वस्त्रांच्या धोक्याचा गंभीर इशारा देऊन अणुऊर्जेच्या शांततापूर्ण वापराला प्रोत्साहन देणे, हे कार्य या समितीने केले.
’‘स्त्रियांना केवळ घरापुरते मर्यादित ठेवणे हे पुरुषसत्तेचे ऐतिहासिक राजकारण आहे.’ हा स्त्रीवादाचा व्यापक सिद्धान्त मांडणाऱ्या तत्त्वज्ञ सिमोन- डी- बोवा यांच्या ‘द सेकंड सेक्स’ ग्रंथलेखनास आरंभ.
’बट्र्राड रसेल यांचे ‘ए हिस्टरी ऑफ वेस्टर्न फिलोसॉफी’ प्रकाशित.

३० जानेवारी १९४८ : देवास येथे आगमन व कायमस्वरूपी वास्तव्य.
देशात
’महात्मा गांधी यांची दिल्ली येथे हत्या.
’सादत हसन मंटो यांचे ‘सियाह हशीये’ (काळी सरहद्द) प्रसिद्ध.
’ऐतिहासिक दस्तऐवजांचे जतन, कला-क्रीडा-विज्ञान अशा सर्व क्षेत्रातील घटनांचे चित्रांकन करण्यासाठी भारतीय फिल्म विभागाची स्थापना करण्याचा प्रस्ताव.
’निजाम राजवटीखालील हैद्राबाद संस्थानातील (मराठवाडा, तेलंगण, आंध्रप्रदेश व कर्नाटकातील तीन जिल्हे) मुक्तिसंग्राम लढा तीव्र झाल्यामुळे १७ सप्टेंबर १९४८ला लष्करी कारवाई करून हैद्राबाद राज्य भारतात सामील केले गेले.

जगात
’जागतिक साहित्यिक व बुद्धिवंत ज्यो पॉल सात्र्, युजीन ओनील, टीएस इलियट यांच्या पुढाकारातून जगात शांतता नांदावी, हिरोशिमा-नागासाकीसारखा भयंकर संहार होऊ नये, यासाठी पोलंड येथे पहिल्या शांतता परिषदेची आखणी.
’अमेरिकेत समाजशास्त्र पदवी शिक्षण पूर्ण करून मार्टिन ल्युथर किंग हे पेनसिल्व्हेनिया येथील ‘क्रोझर थिओलॉजिकल सेमिनरी’मध्ये दाखल. येथेच त्यांना महात्मा गांधींच्या अिहसेच्या तत्त्वज्ञानाबद्दल प्रथम माहिती मिळाली.
’अकिरा कुरोसावा यांच्या ‘राशोमान’ च्या चित्रीकरणास आरंभ.
’बट्र्राड रसेल यांचा ‘ह्युमन नॉलेज- इट्स स्कोप अँड लिमिटेशन्स’ हा ग्रंथ प्रकाशित.
’मुंबई येथे चित्रकार एम. एफ. हुसेन, एस. एच. रझा, एफ.एन. सूझा, के. एच. आरा आणि एस. के. बाक्रे यांनी दृश्य कलांच्या प्रसारासाठी ‘बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्टस ग्रुप’ ची स्थापना केली.

१९५२ / १९५४ दीर्घ आजारपणानंतर संगीत क्षेत्रात पुनरागमन.

१९५२ देशात
’सादत हसन मंटो यांची ‘सडक के किनारे’, ‘पर्दे के पिछे’ व ‘बुरखे’ ही पुस्तके प्रसिद्ध.
’विख्यात रंगकर्मी इब्राहिम अल्काज़ी यांची दिल्ली येथील ‘राष्ट्रीय नाटय़ विद्यालया’च्या निदेशकपदी नियुक्ती.
’मुंबई येथे ‘जहांगीर कला दालना’ची स्थापना.
’एम. एफ. हुसेन यांचे स्वित्र्झलडच्या झुरिच येथे पहिले चित्र प्रदर्शन.
’कुमार गंधर्व, अमीर खान, भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, वसंतराव देशपांडे, किशोरी आमोणकर, प्रभा अत्रे, मालिनी राजूरकर, जसराज, जितेंद्र अभिषेकी, फिरोज दस्तूर यांच्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीतामधील सुवर्णकाळाचे दुसरे पर्व.
’पं. भीमसेन जोशी यांनी पुणे येथे ‘आर्य संगीत प्रसारक मंडळा’च्या वतीने ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सवा’चा आरंभ केला.
’वास्तुशिल्पी लॉरी बेकर यांचे लखनऊ जवळील मनोरुग्णालय व साक्षरता ग्राम पूर्णत्वास.
’बिमल रॉय यांचा ‘दो बिघा जमीन’ चित्रपट प्रदर्शित. भारतीय लोकसंगीत, शास्त्रीय संगीत आणि पाश्चात्य अभिजात संगीत यांचा अप्रतिम मेळ घडवणारे संगीतकार सलिल चौधरी यांची गाणी देशभर लोकप्रिय.
’भारतातील पहिला रंगीत चित्रपट ‘आन’ प्रदर्शित.
’हिंदूी चित्रपट संगीताचे सुवर्णयुग- अनिल विश्वास, सी. रामचंद्र, रोशन, सचिनदेव बर्मन, सलिल चौधरी व मदनमोहन आदी संगीतकार आणि साहिर लुधियानवी, कैफी आझमी, शैलेंद्र, शकिल बदायुनी, मजरूह सुलतानपुरी, प्रेम धवन व राजा मेहदी अलीखान यांची लता मंगेशकर, गीता दत्त, आशा भोसले, मोहम्मद रफी, मन्ना डे, किशोर कुमार व हेमंतकुमार यांची गीते विलक्षण लोकप्रिय झाली.

जगात
’अमेरिकेकडून मार्शल बेटावर पहिल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी.
’पिकासो यांचे ‘युद्ध व शांती’ हे चित्र.
’विज्ञान लेखक आयझ्ॉक असिमोव्ह यांच्या – ‘द करंट ऑफ स्पेस’ कादंबरीत परग्रहावरील मानवी वसाहतीचे वर्णन.

१९५४
देशात

’पं. नेहरूंनी दिल्लीत भारतीय साहित्याच्या विकासासाठी ‘साहित्य अकादमी’, शिल्पकला, चित्रकला, ग्राफिक्स, गृहबांधणी इत्यादींना प्रोत्साहन देण्यासाठी ‘ललित कला अकादमी’ आणि संगीत, नाटक आणि नृत्याच्या प्रगतीसाठी ‘संगीत नाटक अकादमी’ स्थापन केली.
’दिल्लीत ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ची स्थापना.
’सत्यजित राय यांचे ‘पाथेर पांचाली’ चे चित्रीकरण.
’नाटककार, दिग्दर्शक व अभिनेते हबीब तन्वीर यांची ‘आग्रा बाजार’ व ‘शतरंज के मोहरे’ ही नाटके रंगमंचावर.
’ओडिशा येथील ‘कला विकास केंद्र’ या पहिल्या नृत्य संगीत विद्यालयात केलुचरण महापात्रा अध्यापनास रुजू.
’ऋत्विक घटक यांचा ‘नागरिक’ चित्रपट प्रदर्शित.
’विजय तेंडुलकर यांचे ‘श्रीमंत’ नाटक रंगमंचावर.
’डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रामसामी पेरियार यांची रंगून येथील बौद्ध परिषदेत भेट.
’अणुऊर्जेचा वीजनिर्मिती व शेती संशोधनात उपयोग करण्यासाठी डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या पुढाकारातून मुंबई येथे अणु संशोधन केंद्र स्थापन.
’विज्ञान व तंत्रज्ञानातील संशोधनात स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी प. बंगालच्या खरगपूर येथे पहिली ’ भारतीय तंत्रज्ञान संस्था’ स्थापनेच्या नियोजनास आरंभ.
’‘भारतरत्न’ देशातील सर्वोच्च किताब देण्यास आरंभ. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि चंद्रशेखर व्यंकट रामन यांना ‘भारतरत्न.’
’पॉन्डेचरी भारतात विलीन.

जगात
’पूर्व व पश्चिम भेट- मॉस्को येथे पं. रविशंकर आणि येहुदी मेनुहिन यांचे सतार व व्हायोलिन सहवादन.
’मार्टिन ल्युथर किंग यांना बोस्टन विद्यापीठाकडून धर्मशास्त्रावर पीएच.डी. प्रदान.
’डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ व्हिएतनामने अमेरिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय कट रचला असल्याचा दावा करून अमेरिकेचा दरिद्री व्हिएतनामवर हल्ला. अपरिमित जीवित व वित्तहानी करणारे हे ऐतिहासिक युद्ध वीस वर्ष चालले. निरपराध जनतेवरील हिंस्र हल्ल्याविरोधात अमेरिकेतच संतापाची लाट.
’तत्त्वज्ञ बट्र्राड रसेल व आल्बर्ट आइन्स्टाईन यांचा शांततेचा जाहीरनामा प्रसिद्ध. अण्वस्त्रांमुळे निर्माण होणारे धोके अधोरेखित करून जागतिक नेत्यांनी आंतरराष्ट्रीय संघर्षांवर शांततापूर्ण उपाय शोधण्याचे आवाहन केले.
’अकिरा कुरोसावा यांचा ‘सेव्हन सामुराई’ चित्रपट प्रदर्शित.
१९६५ ते १९७४ : वैशिष्टय़पूर्ण संगीत मैफिली.

देशात
’भारताशी आरंभलेल्या युद्धात ४८ दिवसांनी पाकिस्तानने शरणागती पत्करली.
’वास्तुशिल्पी ल कोर्बुझ्ये यांच्याकडून पहिले भारतीय नियोजनबद्ध शहर चंडीगड पूर्णत्वास.
’चित्रकार के.सी.एस. पणिक्कर यांनी चेन्नईजवळ वीस चित्रकार आणि शिल्पकार यांच्यासह ‘चोलमंडल कलाग्राम’ स्थापन केले.
’लेखक मुल्कराज आनंद यांचे ‘मॉर्निग फेस’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध.
’सत्यजित राय यांचे ‘कापुरुष ओ महापुरुष’, ‘नायक’, ‘चिडियाखाना’,’गोपी गाये बाघा बाजे’, ‘अरण्येर दिन रात्री’, ’प्रतिद्वन्द्वी’, ‘सीमाबद्ध’, ‘अशनी संकेत’ व ‘सोनार केला’ हे चित्रपट प्रदर्शित.
’ऋत्विक घटक यांचे ‘सुबर्णरेखा’ व – जुक्ती टाको आर गपो’ हे चित्रपट प्रदर्शित.
’मृणाल सेन यांचे चित्रपट- ‘मुलाखत’, ‘कलकत्ता ७१’, ‘पडतीक’ व ‘कोरस’ हे चित्रपट प्रदर्शित.
’नाटककार, दिग्दर्शक व अभिनेते हबीब तन्वीर यांचे ‘’चरणदास चोर’ हे नाटक रंगमंचावर.
’नाटककार विजय तेंडुलकर यांची ‘एक हट्टी मुलगी’, ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘अशी पाखरे येती’, ‘गिधाडे’, ‘सखाराम बाइंडर’ व ‘घाशीराम कोतवाल’ ही नाटके रंगमंचावर आली.
’नाटककार महेश एलकुंचवार यांची ‘रुद्रवर्षां’, ’सुलतान’, ‘एका म्हाताऱ्याचा खून’, ‘यातनाघर’, ‘गाबरे’, ‘वासनाकांड’ व ‘पार्टी’ ही नाटके रंगमंचावर.
’लेखक मोहन राकेश यांचे ‘आधे अधुरे’ हे नाटक रंगमंचावर.
’प्रतिभावंत संगीतकार सचिनदेव बर्मन यांचे निधन.
’लेखक गजानन माधव मुक्तिबोध यांची ‘विपात्र’ ही कादंबरी, ‘सतह से उठता आदमी’ आणि ‘नये साहित्य का सौंदर्यशास्त्र’ ही पुस्तके प्रकाशित.
’नाटककार, दिग्दर्शक व अभिनेते गिरीश कर्नाड यांची ‘तुघलक’ व ‘हयवदन’ ही नाटके रंगमंचावर.
’अभिनेता, नाटककार तथा निर्देशक बादल सरकार यांचे ‘बाकी इतिहास’ हे नाटक रंगमंचावर आले.
’कविवर्य नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, दया पवार, प्र. ई. सोनकांबळे व बाबूराव बागूल आदी प्रभृतींच्या दलित साहित्यातून मूकनायकांचा एल्गार. भारतीय साहित्याला नवे वळण.
’विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर, गिरीश कर्नाड, मोहन राकेश, बादल सरकार, शंभू मित्र, अब्राहम अल्काझी, सत्यदेव दुबे, विजया मेहता, अमोल पालेकर, अरिवद देशपांडे, नसीरुद्दीन शहा, बी.व्ही. कारंथ, बन्सी कौल, हबीब तन्वीर व रतन थिय्यम आदी लेखक-दिग्दर्शक यांच्यामुळे भारतीय नाटय़ क्षेत्रात विलक्षण घुसळण.
’ब्राझीलमधील साओ पावलो बिएनालेमध्ये एम.एफ. हुसेन व पाब्लो पिकासो हे विशेष अतिथी.
’लॉरी बेकर यांनी आळकियापाण्डीपूरम
येथे भारतातील पहिले बालग्राम साकारले. राज्य भाषा संस्था, दिग्दर्शक अदूर गोपाळकृष्णन यांचा ‘चित्रलेखा’ स्टुडीओ, पूरग्रस्तासाठी वसाहत पूर्णत्वास. ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज्’ विद्यापीठ संकुल रचनेस आरंभ.
’१९६१ साली आरंभ झालेल्या दिल्ली येथील ‘भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थे’चे पुणे येथे स्थलांतर.
’गुजरातच्या आणंद येथील ‘अमूल को- ऑपरेटिव्ह सोसायटी’ चे संचालक डॉ. वर्गीस कुरियन यांच्या सूचनेनुसार राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाची स्थापना. भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला.
’लागोपाठ दोन वर्षे एक टन गहू आयात करणाऱ्या भारतामध्ये गव्हाचे दीड कोटी टन उत्पादन.
’स्वावलंबनाकडे वाटचाल करणाऱ्या हरित क्रांतीचा आरंभ.
’पं. जसराज यांच्या पुढाकाराने पं. मोतीराम- पं. मणिराम संगीत समारोह तर पं. सी. आर. व्यास यांच्या पुढाकाराने गुणिदास संगीत संमेलन आयोजनास आरंभ.
’मन्सूरअली खान पतौडीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाचा विदेशातील पहिला विजय.
’भारतीय संख्याशास्त्रीय संस्था व जाधवपूर विद्यापीठ यांनी पूर्णपणे भारतीय बनावटीचा पहिला संगणक तयार केला.
’अवकाश विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राने पूर्णपणे भारतीय बनावटीच्या ‘रोहिणी’ अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
’‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन’ची स्थापना.
’१९६२ पासून दिल्लीपुरत्या मर्यादित दूरदर्शनचे मुंबईत आगमन. त्यानंतर कोलकाता, चेन्नई, लखनऊ येथेही दूरदर्शन केंद्र निर्माण केली गेली.
’उत्तराखंडमधील रेनी गावात (जिल्हा-चमोली)२७ महिलांनी प्राणाची बाजी लावून झाडांना चिकटून ‘चिपको आंदोलना’ने वृक्षतोड रोखण्यात यश मिळवले.
’केरळमधील प्रस्तावित वीजनिर्मिती प्रकल्पाद्वारे सदाहरित जंगल ‘सायलेंट व्हॅली’चा नाश थांबवण्यासाठी लेखक, कलाकार, शास्त्रज्ञ, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची चळवळ.
’ध्वनिमुद्रण जगत व संगीतप्रेमींसाठी कॅसेटचे व टेपरेकॉर्डरचे पर्व सुरू.

जगात
’सोव्हिएत युनियनचे अलेक्सी लिओनोव्ह हे अवकाशात भ्रमण करणारे पहिले अंतराळवीर ठरले.
’अमेरिकेतील कृष्णवर्णीय नागरिकांच्या हक्कांसाठी शांततापूर्वक संघर्ष करणाऱ्या मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनियर) यांची हत्या.
’‘युद्ध नको शांती हवी’, ‘रोजगार द्या’, ‘महागाई कमी करा’, ‘सर्वाना समान हक्क द्या’, ‘प्रदूषण हटवा’ या मागण्यांसाठी जगभरातील तरुणांनी आंदोलन चालू केली.
’२२ एप्रिल १९७० रोजी अमेरिकेतील रस्ते, उद्याने, चौक, महाविद्यालये, कार्यालयांमध्ये लाखो तरुण, महिला आणि मुलांनी पहिला ‘वसुंधरा दिन’ साजरा केला.
’जगातील पर्यावरणाच्या रक्षणासाठी स्टॉकहोम, स्वीडन येथे संयुक्त राष्ट्रांनी १९७२ ला पहिली जागतिक परिषद भरवली.
’ज्याँ पॉल सार्त् यांनी साहित्यातील नोबेल पुरस्कार नाकारला.
’अकिरा कुरोसावा यांची ‘रेड बिअर्ड’ व ‘देर्सू उझाला’ हे चित्रपट प्रदर्शित.
’बट्र्राड रसेल यांचे ‘द डय़ूटी ऑफ फिलोसॉफर इन धिस एज’ प्रकाशित.
’‘बीटल्स’ या इंग्लिश रॉक संगीत चमूने आणलेल्या संगीतातील नव्या लाटेने सांस्कृतिक विश्व पालटून गेले.

१९६९/ ७० : गांधी शताब्दी निमित्त गांधी मल्हार रागाची निर्मिती व गायन.
देशात

’महात्मा गांधी यांना जन्मशताब्दी निमित्ताने जगभरातून मानवंदना. शंभर राष्ट्रांकडून पोस्टाचे तिकीट जारी. संयुक्त राष्ट्रसंघाची २ ऑक्टोबर हा ‘अिहसा दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा.
’गांधीजींच्या सन्मानार्थ एम.एफ. हुसेन यांचे ‘शांतीचे चित्र’.
’गांधीजींच्या आदरार्थ पं. रविशंकर यांच्याकडून ‘मोहनकंस’ रागाची निर्मिती.
’बासू चटर्जी यांच्या ‘सारा आकाश’ व मृणाल सेन यांच्या ‘भुवनशोम’ या चित्रपटांनी नवा प्रवाह चालू केला.
’भारतात पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १४ मोठय़ा बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.

जगात
’सॅम्युअल बेकेट यांना साहित्याचे नोबेल प्रदान करण्यात आले.
’मारिओ पुझो यांची ‘गॉडफादर’ कादंबरी प्रकशित.
’अमेरिकेचे अपोलो -२ अवकाशयान चंद्रावर उतरले.

८ एप्रिल १९८४ कुमार गंधर्व यांची षष्टय़ब्दी पूर्ती.
देशात

’महेश एलकुंचवार यांचे ‘वाडा चिरेबंदी’ रंगमंचावर.
’सत्यजित राय यांचा ‘घरे बाइरे’ चित्रपट प्रदर्शित.
’अदूर गोपालकृष्णन् यांचा ‘मुखामुखम्’ चित्रपट प्रदर्शित.
’मणी कौल यांचे कुंभारी कलेवरील वृत्तचित्र ‘माटीमाणस’ प्रदर्शित.
’पं. रविशंकर यांची सतार, अकबर अली खान यांची सरोद व उस्ताद अल्लारखाँ यांचा तबला यांतून रागमाला.
’कोलकाता येथे भूमिगत रेल्वे- मेट्रोची सुविधा चालू.

जगात
’‘अॅपल मॅकॅन्टोष कंपनी’चा पहिला वैयक्तिक संगणक बाजारात उपलब्ध झाला.
’पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांची ‘सोयुझ ११’ मधून यशस्वी फेरी.
’एड्सच्या विषाणूची ओळख पटली.
’ध्वनिमुद्रण जगतात चिमुकल्या तबकडीचे (कॉम्पॅक्ट डीस्क ) आगमन व प्रसार.

१२ जानेवारी १९९२ : देवास येथे निधन
देशात

’सत्यजित राय यांचा अखेरचा चित्रपट ‘आगंतुक ’ प्रदर्शित.
’नाटककार, दिग्दर्शक व अभिनेते हबीब तन्वीर यांचे ‘जिसने लाहोर नही देख्या’ हे नाटक रंगमंचावर.
’महेश एलकुंचवार यांचे ‘युगांत’ हे नाटक रंगमंचावर.
’फ्योदोर दस्तयेवस्कि यांच्या अभिजात कादंबरीवर मणी कौल यांचा ‘इडियट’ प्रदर्शित.
’ए. आर. रहेमान यांच्या ‘रोजा’ चित्रपटाच्या संगीतामुळे संगीतसृष्टीस नवा आयाम.

जगात
’२७ वर्षे आफ्रिकी तुरुंगात स्थानबद्ध नेते नेल्सन मंडेला यांच्या सुटकेसाठी जगभरातील नेत्यांचा दबाव वाढत चालल्याने गोरे आफ्रिकी सरकार झुकण्याची चिन्हे दिसू लागली.
’फ्रांस्वा मितारोन, हेल्मुट कोल व होर्सट कोहलर या फ्रांस, जर्मन व पोलंड राष्ट्रप्रमुखांची, २७ युरोपीय देशांच्या आर्थिक व राजकीय सहकार्यातून युरोपीय संघ निर्मितीस सहमती.
’आय.बी.एम. सायमन कंपनीने पडदास्पर्शी (टचस्क्रीन) चलतध्वनी हा पहिला चटपटीत फोन बाजारात आणला.

atul.deulgaonkar@gmail.com

Story img Loader