परभणी : अन्य राज्यांतील नागरिक असल्याचे आधार कार्ड असणाऱ्या तसेच जन्म मृत्यू नोंदणी अर्जाच्या संचिकेसोबत खाडाखोड केलेला शाळा सोडण्याचा दाखला देणाऱ्या सतरा जणांविरुद्ध येथे गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे यांनी दिली. येथून अनेक खोटे जन्म दाखले देण्यात आल्याची तक्रार सुरुवातीला किरीट सोमय्या यांनी परभणीत येऊन पोलीस ठाण्यात दिली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तहसीलदारांना यासंदर्भातील सत्यता स्पष्ट करण्याबाबत कळवले होते. पोलिसांच्या पत्रानंतर तहसीलदारांनी यासंदर्भात कार्यवाही सुरू केली आहे.
या पडताळणी दरम्यान दोन जणांचे आधारकार्ड हे तेलंगणा व एकाचे गुजरात येथील असल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर पुनर्तपासणी केली असता ७ अर्जदारांच्या टिसीमध्ये खाडाखोड केल्याचे आढळून आले आहे. अशा एकूण १० अर्जदारांवर गुन्हे नोंदविले आहेत. तसेच निर्गमित आदेशासोबत जोडलेली टिसी, निर्गम उतारा यांची संबंधित ५६ शाळा,महाविद्यालय प्रमुख यांच्यामार्फत एकूण १ हजार ५२१ टिसी, निर्गम उताऱ्यांची पडताळणी केली असता त्यापैकी ३५ शाळांचा अहवाल तहसील कार्यालयात प्राप्त झाला असून, त्या अहवालांपैकी ७ अर्जदारांनी अहवालानुसार नावात बदल व तफावत असल्याचे आढळून आली आहे. या अहवालानुसार एकूण ७ अर्जदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशा एकूण १७ अर्जदारांवर गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती यावेळी राजपूरे यांनी दिली.
निर्गमित केलेल्या सर्व आदेश संचिकेची तपासणी करण्यात आली असून, या संचिकेसोबत टिसी-निर्गम उतारा इ. शैक्षणिक कागदपत्रे जोडण्यात आलेल्या एकूण १ हजार ५२१ संचिका आहेत. तसेच टिसी-निर्गम उतारा इ. शैक्षणिक कागदपत्रे जोडलेली नाहीत, अशा एकूण ६७१ संचिका आढळून आल्या आहेत. टिसी अथवा निर्गम उताऱ्यांची तपासणी करुन देण्याबाबत सूचना देण्यासाठी बैठक आयोजित करून संबंधित शिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांना पत्र देण्यात आले होते. तसेच निर्गमित आदेशाच्या संचिकेस टिसी-निर्गम उतारा जोडण्यात आलेला नाही. अशा एकूण १०३ अर्जदारांना समक्ष सुनावणी कामी मूळ कागदपत्र घेऊन बोलविण्यात आले व समक्ष मूळ कागदपत्रे तपासण्यात आलेली आहेत. त्यापैकी उपस्थित ४० अर्जदारांच्या सुनावणीमध्ये त्यांनी पासपोर्ट, शासनाचे ओळखपत्र, निर्गम उतारा, शाळा सोडल्याचा दाखला, मतदान कार्ड, आधारकार्ड अशा प्रकारे कागदपत्रे दाखल केली आहेत.