रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर दरवर्षी घसरत असल्याचे आरोग्य खात्याच्या आकडेवारीतून  समोर आले आहे. जिल्ह्यात मुलींच्या जन्म दरात होणारी घसरण पाहता आरोग्य विभागाचे ‘ टेन्शन ‘ वाढले आहे. या गंभीर समस्येवर शासनाच्या आरोग्य विभाग स्तरांवर अनेक उपाय योजना केल्या जात असल्यातरी या योजना फेल गेल्याचे घसरत्या आकडेवारीनुसार समोर आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात २०२०-२१ सालामध्ये ८ हजार ४५ मुले तर  ७ हजार ७०३ मुली जन्माला आल्या आहेत. यावर्षाचा जन्मदर ९५७ इतका होता. तर २०२२-२३ सालामध्ये मुलींचा जन्मदर ९१८ आणि २०२४-२५ मध्ये हाच जन्मदर ९४२ राहिलेला आहे. काही अंशाने जन्मदर कमी होत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मागील पाच वर्षात  ३४ हजार ३२ मुलगे आणि ३२ हजार १२६ मुली असे मिळून ६६ हजार १५८ मुलांचा जन्म झाला आहे. आरोग्य विभागाकडील  आकडेवारीनुसार, मागील पाच वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर हा कमी होत आहे. पाच वर्षांपूर्वी हजार मुलांमागे ९५७ मुली जन्मल्या होत्या. तर २०२४-२५ या वर्षात हजार मुलांमागे ९४२ मुलीं जन्मल्या असल्याचे आकडेवारी नुसार दिसते. मात्र दरवषी या आकडेवारीत घट होत आल्याने ही आकडेवारी स्थिर ठेवण्याचे आव्हान आता आरोग्य खात्यासमोर उभे राहीले आहे. ही घटणारी आकडेवारी आरोग्य विभागाची चिंता वाढवणारी ठरली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर पाहता आरोग्य विभागाने रत्नागिरी जिल्ह्यात आणखी प्रभावी योजना व मानसिकता यावर मोठा भर देण्याची गरज असल्याचे दिसत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात बराच भाग आजही दुर्गम आहे. याठिकाण राहणा-या लोकांची मानसिकता आणि त्यांचे राहणीमान आजही मागासलेले आहे. वंशाला दिवा पाहिजे म्हणून मुलगा हवा, अशी अनेक वर्षापूर्वीची मानसिकता जिल्ह्यातील ब-याच कुटुंबांमध्ये बघायला मिळत आहे.  मात्र लोकांची ही मानसिकता बदलण्यासाठी राज्य शासनाने ‘बेटी बचाओ’ सारख्या योजना  राबवण्यास सुरवात केली आहे. यासाठी शासन-प्रशासन आणि  सामाजिक संस्थाच्या माध्य्मातून लोकांमध्ये जनजागृतीही केली जात आहे. मुलापेक्षा मुलगी बरी, घर प्रकाशमान  करते. अशा अनेक  म्हणी तयार करुन स्त्री जन्माचे महत्वही सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतू याला रत्नागिरी जिल्ह्यातून जास्त प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काही ठिकाणी आरोग्य खात्याने छापे टाकून लिंग निदान चाचणी करणारी केंद्रे कारवाई करत बंद पाडली आहेत.  मात्र  याचा ही फारसा फरक पडला नसल्याने दिसत आहे.  मागील पाच वर्षात मुलींचा जन्मदर कमी-अधिक राहिला असल्याचेच  दिसत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांच्या राहणीमानात आणि शैक्षणिक दर्जात चांगलीच वाढ झाली आहे. मात्र मुलीं बाबतची मानसिकता आजही जुनाट मागासलेली राहिली आहे. पूर्वी एका कुटुंबामध्ये अनेक मुले जन्माला घातली जात होती. यावर शासनाने संतती नियोजनाची एक प्रभावी योजना राबवण्यास सुरूवात केली. समाजात झालेले बदल, शिक्षणाचा वाढलेला टक्का व  बदलते राहणीमानामुळे कुटुंबे सुशिक्षित झाली असली तरी  समाज जडणघडणीत वंशाचा दिवा हवाच, ही मानसिकता कमी करण्यात सर्वांनाच अपयश आले आहे. राज्यातील मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी शासनाने कायद्याद्वारे लिंगनिदान, स्त्री भ्रूणहत्या करावयास बंदी घातली आली आहे. तसेच मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी शासनाकडून  माझी भाग्य योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना यांसारख्या योजना राबवण्यात येत आहेत. तरीही दरवर्षी जन्माला येणाऱ्या मुलांच्या आकडेवारीचा विचार करता मुलांच्या तुलनेमध्ये मुलींचा जन्मदर हा कमीच  होत जात असल्याचे दिसत आहे. यावर शासनाने गंभीर विचार करणे गरजेचे असल्याचे मत रत्नागिरी जिल्ह्यातील  लोकांमधून व्यक्त केले जात आहे.

साल         मुलींचा जन्मदर

२०२० – २१        ९५७

२०२२ – २३        ९१८

२०२४ – २५         ९४२

Story img Loader