प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे वेळोवेळी मागणी करूनही रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने धनेगाव येथील नागरिकांनी खड्डेमय रस्त्याचा ‘वाढदिवस’ केक कापून उत्साहात साजरा केला. सत्ताधाऱ्यांचा या प्रकारे निषेध करून या प्रश्नाकडे नव्याने लक्ष वेधले.
नांदेड-लातूर-तुळजापूर महामार्गावर धनेगाव-आंबेडकर चौक दरम्यान अनेक लहान-मोठे खड्डे पडले आहेत. वर्षभरापासून या परिसरातील नागरिक रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करीत आहेत. खड्डेमय रस्त्यामुळे नित्यनेमाने घडणारे अपघात डोकेदुखी ठरत आहेत. मार्गावरून जड वाहने जातात. शिवाय छोटीमोठी वाहने याच मार्गावरून धावत असल्याने हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे करण्यात आली. नांदेड दक्षिणचे आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनाही साकडे घालण्यात आले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गंगाधर कवळे यांनी पोकर्णा यांची भेट घेऊन लक्ष वेधले. परंतु आश्वासनावर बोळवण करण्यात आली.
सुमारे वर्षभरापासून रस्त्यावरील खड्डय़ांचा त्रास सहन करणाऱ्या त्रस्त नागरिकांनी शनिवारी रस्त्यावरील खड्डय़ातच केक कापून हा वाढदिवस ‘साजरा’ केला! वारंवार सांगूनही उपयोग होत नसल्याने हे आंदोलन केल्याचे गंगाधर कवळे यांनी सांगितले. प्रशासन लक्ष देत नाही, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष या चक्रात जिल्ह्यातील इतरही अनेक रस्त्यांची अशीच केविलवाणी अवस्था आहे. सुमारे ३०० ते ४०० नागरिक यात सहभागी झाले होते.
खड्डेमय रस्त्याचा ‘वाढदिवस!’
प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे वेळोवेळी मागणी करूनही रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने धनेगाव येथील नागरिकांनी खड्डेमय रस्त्याचा ‘वाढदिवस’ केक कापून उत्साहात साजरा केला. सत्ताधाऱ्यांचा या प्रकारे निषेध करून या प्रश्नाकडे नव्याने लक्ष वेधले.
First published on: 31-08-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Birthday of potholes in nanded