Maharashtra Assembly Election Bitcoin Scam Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर मतदानाच्या पूर्वसंध्येला गंभीर आरोप करण्यात आले. निवडणुकीत परकीय चलन वापरल्याचा व अनेक आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापर केल्याचा आरोप या दोन्ही नेत्यांवर करण्यात आलाय. पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी हे आरोप केले असून भाजपा खासदार व प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री पत्रकार परिषद घेऊन हे आरोप माध्यमांसमोर विषद केले.  यासंबंधीचे कथित पुरावे म्हणून काही कॉल रेकॉर्डिंग्स व व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सचे स्क्रीनशॉट सादर केले. दरम्यान, यावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“जी व्यक्ती काही महिने तुरुंगात होती, त्याची नोंद तरी कशी घ्यायची? माझ्या मते त्याची नोंदही घ्यायची आवश्यकता नाही”, असं म्हणत शरद पवारांनी भाजपावरही निशाणा साधलाय. ते म्हणाले, “असे आरोप करून भाजपा किती खालच्या पातळीवर जाऊ शकते याचं हे उदाहरण आहे. “

हेही वाचा >> Bitcoin Scam : महाराष्ट्रात बिटकॉइन स्कॅम? व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीनशॉट्स दाखवत भाजपाचा सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप

“नागरिकांनी मतदान केलं पाहिजे. महाराष्ट्रातील जनता मोठ्या प्रमाणात मतदान करेल. महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार हे २३ नोव्हेंबरनंतर स्पष्ट होईलच”, असंही शरद पवार म्हणाले. बारामती येथे मतदान करून आल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या आरोपांवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सुप्रिया सुळेंवरील आरोपाबाबत चौकशी केली जाईल. चौकशीनंतरच खरं-खोटं लोकांसमोर येईल

भाजपाच्या आरोपांवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

खासदार सुप्रिया सुळे यांनी हे आरोप फेटाळले आहेत. त्यांनी याबाबत एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की भाजपाच्या सुधांशू त्रिवेदी यांनी केलेले आरोप निराधार आहेत. मात्र मला त्याचं आश्चर्य वाटत नाही, कारण मतदानाच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारचे आरोप नेहमीच केले जातात. त्यांच्याकडून (भाजपा) अशा प्रकारे खोटी माहिती पसरवण्याचे प्रयत्न नेहमीच होतात. त्यांनी केलेल्या आरोपांकडे दुर्लक्ष न करता मी त्यांच्याविरोधात खटला दाखल करणार आहे. माझे वकील त्यांच्याविरोधात मानहानीचा फौजदारी व दिवाणी खटला भरतील. आम्ही त्यांना तशी नोटीस बजावणार आहोत.

.