Maharashtra Assembly Election Bitcoin Scam Sudhanshu Trivedi : महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी मतदानाला नुकतीच सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी, मतदानाच्या पूर्वसंथ्येला भाजपाने महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निवडणुकीत परकीय चलन वापरल्याचा व अनेक आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापर केल्याचा आरोप केला आहे. भाजपा खासदार व प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले आणि यासंबंधीचे कथित पुरावे म्हणून काही कॉल रेकॉर्डिंग्स व व्हॉट्सअॅप चॅट्सचे स्क्रीनशॉट सादर केले. भाजपाच्या या आरोपांनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच त्रिवेदी यांच्याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचं खासदार सुळे यांनी म्हटलं आहे.
रवींद्र पाटील यांनी सुप्रिया सुळे व नाना पटोले यांच्यावर आरोप केल्यानंतर भाजपाने हे आरोप रेटायला सुरुवात केली आहे. भाजपाने मंगळवारी रात्री पत्रकार परिषद घेत पटोले व सुळे यांच्यावर आरोप केले. परदेशी चलनाचा वापर करून सुळे व पटोले यांनी निवडणुकीवर, मतदानावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी केली जावी, अशी मागणी देखील सुधांशू त्रिवेदी यांनी केली आहे.
हे ही वाचा >> पहाटे मतदान केल्यानंतर अजित पवारांचं मुख्यमंत्रिपदाबाबत महत्त्वाचं वक्तव्य
भाजपाच्या आरोपांवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी हे आरोप फेटाळले आहेत. त्यांनी याबाबत एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की भाजपाच्या सुधांशू त्रिवेदी यांनी केलेले आरोप निराधार आहेत. मात्र मला त्याचं आश्चर्य वाटत नाही कारण मतदानाच्या पूर्वसंथ्येला अशा प्रकारचे आरोप नेहमीच केले जातात. त्यांच्याकडून (भाजपा) अशा प्रकारे खोटी माहिती पसरवण्याचे प्रयत्न नेहमीच होतात. त्यांनी केलेल्या आरोपांकडे दुर्लक्ष न करता मी त्यांच्याविरोधात खटला दाखल करणार आहे. माझे वकील त्यांच्याविरोधात मानहानीचा फौजदारी व दिवाणी खटला भरतील. आम्ही त्यांना तशी नोटीस बजावणार आहोत.
हे ही वाचा >> Live: अभिनेता अक्षय कुमारनं मुंबईत केलं मतदान, हक्क बजावल्यानंतर म्हणाला…
बिटकॉइन स्कॅमचे आरोप करत त्रिवेदी म्हणाले,” ही फार गंभीर गोष्ट आहे. याद्वारे महाविकास आघाडीचा भ्रष्टाचार हळूहळू समोर येऊ लागला आहे.
सुधांशू त्रिवेदी यांनी सुप्रिया सुळे, नाना पटोलेंसह मविआला काही प्रश्न विचारले आहेत
- तुम्ही बिटकॉइन्समध्ये व्यवहार केला आहे का?
- डीलर गौरव मेहता व अमिताभ गुप्ता यांच्याशी संपर्क साधला आहे का?
- हे व्हॉट्सअॅप चॅट तुमचं आहे का?
- हे चॅट तुमचं असेल तर यामध्ये तुम्ही कोणाबद्दल बोलताय?
- या कॉल रेकॉर्डिंग्समधील आवाज तुमचाच आहे का?