शेतकऱ्यांच्या समस्येत सतत वाढ होत असून त्याला जागतिकीकरण हे कारण असू शकते. भारतात दर ३० मिनिटाला एक शेतकरी आत्महत्या करीत असल्याने शासनाचा शेतक ऱ्यांकडे पर्यायाने शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. शासनाने शेतक ऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली म्हणजे शासनाची जबाबदारी संपली असे नाही. तर शासनाने आजच्या स्पर्धेच्या युगात शेतक ऱ्यांच्या पाठीशी राहावे, असे ‘बीटर सीडस्’ या माहितीपटाचे निर्माते मिका पिलेड यांनी सांगितले.    
‘विदर्भातील कापूस उत्पादकांच्या समस्या आणि त्यावरील उपाय’ यावर ते बोलत होते. शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीत अडकून न राहता त्यांनी शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. तसेच जागतिकीकरणाच्या स्पर्धेत शेतकऱ्यांना टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने शासनाने शेतीतील आपला सहभाग वाठवायला हवा, असेही त्यांनी नागपूर श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
 ‘बीटर सीडस्’ हा माहितीपट विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि कापूस उत्पादक शेतकरी त्याची व्यथा मांडणारा असून जागतिक चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला गौरविण्यात येत आहे. ‘ऑक्सफेम ग्लोबल जस्टीस’ आणि ‘आयडीएफए ग्रीन कॉम्पिटिशन अवॉर्ड’ हे दोन अवॉर्ड या माहितीपटाने मिळविले आहेत. या माहितीपटाची निर्मिती मोन्सॅन्टो  कंपनीने केली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन दरबारी मदत मिळेल, असा विश्वास मिका पिलेड यांनी व्यक्त केला. भारत हा कृषीप्रधान देश असूनही दर ३० मिनिटाला एक शेतकरी आत्महत्या करत असतो. शेतकऱ्याच्या आत्महत्येमागील कारणे शोधण्याचा प्रयत्न या माहितीपटातून केला आहे. याचे चित्रिकरण विदर्भात झाले असून विशेषत: यवतमाळ जिल्ह्य़ातील कोलझरी, मारेगाव, भामराजा, शिमनी, सायखेडा. तेलंग टाकळी आणि वडा येथे करण्यात आले आहे.
‘बीटर सिडस्’ या १८ आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आणि १०० पेक्षा जास्त चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आलेल्या चित्रपटाने औद्योगिक शेतीमुळे, शेतीच्या बदललेल्या रूपामुळे भविष्याला मिळणाऱ्या कलाटणीवर भाष्य करण्यात आले आहे. अमेरिकन कंपन्यांनी बियांमध्ये घडवून आणलेल्या जनुकीय परिवर्तनानंतर जगभर त्याचा प्रचार आणि प्रसार करून प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशांतील लोकांसाठी ते एकमेव उपाय असल्याचा प्रचार करीत आहेत. त्यामुळे कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी गमावल्या आहेत. देशभरात अशीच स्थिती असून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संसर्गामुळे लाखो शेतकऱ्यांनी जीव गमावले आहेत. शेतकरी कर्जात पुरता बुडाला असून कुटुंबाला पोसण्यात तो अपयशी ठरल्याने त्याने आत्महत्येचा मार्ग जवळ केल्याचे या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. भारतीय बियाणे बाजारात मुख्य पिकांसाठी भरपूर बियांची मागणी असताना केवळ जनुकीयदृष्टय़ा सुधारित (जीएम) करण्यात आलेले बियाणेच दुकानात दिसते. हे जीएम बियाणे महागडे असून त्यांच्यासाठी अतिरिक्त खते आणि कीटकनाशकेही वापरावी लागतात तसेच ती दरवर्षी खरेदी करावी लागतात. यासर्व प्रश्नांची गोळाबेरीज करून त्यांना कापूस उत्पादक शेतकरी रामकृष्णच्या व्यथेच्या रूपाने ‘बिटर सिडस्’मध्ये दाखवण्यात आले आहे.
मिका पिलेड बरोबर काम करताना आव्हानात्मक वाटले असून हा माहितीपट वास्तविकतेला धरून आहे. शेती साठी मुलाला कराव्या लागलेल्या प्रत्येक गोष्टीचे त्यांनी बारीकसारीक निरीक्षण केले आहे. यातील प्रत्येक पात्र हे खरेखुरे आहे. मिकाचा वृत्तपट हा वास्तविकतेला धरून आहे. त्याने या समस्येचा अभ्यास करण्यासाठी एका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाबरोबर दोन वर्षे घालविली, अशी माहिती निर्माते श्याम धर्माधिकारी यांनी दिली.
नागपूर श्रमिक पत्रकार संघातच्यावतीने मिका पिलेड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर, टिळक पत्रकार भवन व्यवस्थापन ट्रस्ट मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मैत्र आणि शेतकरी नेते किशोर तिवारी उपस्थित होते.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा