भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी स्वतसह जिल्हय़ातील ५ जागांवर विजय मिळवून राष्ट्रवादीचा दारुण पराभव केला. बीड मतदारसंघात ऐनवेळचे भाजप उमेदवार विनायक मेटे यांनी राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांच्याशी निकराची लढत दिली. मात्र, क्षीरसागर अवघ्या साडेपाच हजारांच्या मताधिक्क्याने विजयी झाले.
जिल्हय़ातील ६ जागांवर २००४ च्या निकालाची पुनरावृत्ती झाली. राज्याचे लक्ष लागलेल्या परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे व राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे या बहीण-भावाच्या चुरशीच्या लढतीत पंकजा मुंडे यांनी २६ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला. बीड मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जागा राखली. मागील वेळी क्षीरसागर ७६ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. त्यांना अवघ्या १५ दिवसांपूर्वी ऐनवेळी भाजपची उमेदवारी केलेल्या शिवसंग्रामच्या विनायक मेटे यांनी निकराची लढत दिली. शिवसेनेचे अनिल जगताप तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
गेवराई मतदारसंघात भाजप उमेदवार अॅड. लक्ष्मण पवार यांनी जिल्हय़ात सर्वाधिक ५० हजारांच्या मताधिक्याने राष्ट्रवादीच्या बदामराव पंडित यांचा दारुण पराभव केला. केज मतदारसंघातील तिरंगी लढतीत भाजपच्या संगीता ठोंबरे यांनी राष्ट्रवादीच्या नमिता मुंदडा यांचा ४२ हजारांच्या फरकाने पराभव केला. या ठिकाणी काँग्रेसच्या अंजली घाडगे यांनी मते खेचल्यामुळे राष्ट्रवादीला फटका बसला. माजलगाव मतदारसंघात भाजपच्या आर. टी. देशमुख यांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्यावर ३४ हजार मतांच्या फरकाने मात केली.
आष्टी मतदारसंघात चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस यांना शेवटच्या टप्प्यात भाजप उमेदवार भीमराव धोंडे यांनी ६  हजारांच्या मताधिक्याने पराभवाची धूळ चारली. सुरुवातीपासूनच सर्वच मतदारसंघांत भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवारांतच थेट लढत झाली. शिवसेना, काँग्रेस व मनसेच्या उमेदवारांना मतदारांनी दुर्लक्षित केल्याचे स्पष्ट झाले. २००४ च्या निवडणुकीत भाजपचे ५ व राष्ट्रवादीचा १ आमदार विजयी झाला होता. राष्ट्रवादीच्या रमेश आडसकर यांना भाजपमध्ये घेतल्याने भाजपला केज, माजलगाव व परळी मतदारसंघांत चांगला फायदा झाला. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे ५ व भाजपचा १ असे संख्याबळ होते. या वेळी पुन्हा २००४ ची पुनरावृत्ती झाली. जिल्हय़ातून राष्ट्रवादीच्या ५ जागा खेचून पंकजा मुंडे यांनी आपली राजकीय पकड घट्ट केल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा