पंधरा वर्षांच्या संघर्षांनंतर सत्ता मिळाल्याने अनेकांना गडबड झाली आहे. पण मिळालेली सत्ता टिकवायची असेल तर संयमाने वागा, शिस्त पाळा, शिजेपर्यंत दम धरलात आता निवेपर्यंत धीर धरा. स्त्रीमध्ये माणूस पारखण्याची वेगळी क्षमताअसते. त्यामुळे मला काही कळत नाही असे समजून चुकीच्या कामात अडकविण्याचा प्रयत्न करू नका. बदल्यांची, गुत्त्यांची कामे सांगू नका असा इशारा देऊन आता फुकट पसे मिळवण्याचे दिवस गेले आहेत. मेहनत करूनच पसे कमवावे लागतील. सार्वजनिक विकास कामातून लोकांची मने जिंका, अशा शब्दात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना ‘समजावत’ लाल दिव्याच्या गाडीत बसण्याची स्पर्धा करू नका, परस्पर कार्यक्रम ठरवू नका, असा दम भरला.

बीड जिल्हा भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाच्या पाश्र्वभूमीवर शनिवार, दि. १० जानेवारी रोजी रात्री दहा वाजता ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत स्वागत लॉन्स येथे भाजप कार्यकर्त्यांची बठक झाली. या वेळी पक्षाचे आमदार भीमराव धोंडे, आर.टी.देशमुख, लक्ष्मण पवार, संगीता ठोंबरे, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, फुलचंद कराड, सर्जेराव तांदळे यांच्यासह आजी माजी आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मंत्री झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी थेट बोलण्यासाठी मी आले आहे असे सांगत त्यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. पाच वर्षांपूर्वी परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून आमदार झाल्यानंतर जिल्ह्य़ातील लोकांनी आपल्याला स्वीकारले. सामान्य जनतेने कधीच नाकारले नाही, धुतकारले नाही. पाण्याच्या रंगाप्रमाणे प्रत्येक भागातील लोकांमध्ये मी मिसळून गेले. स्व. मुंडे यांचे जीवन एका रूमच्या खोलीपासून सत्तेत जाईपर्यंत आलेले बरे-वाईट अनुभव मी पाहिले आहेत. त्यामुळे मी मंत्री झाले असले तरी याचे आपल्याला काहीच कौतुक नाही. सत्तेपेक्षा सर्वसामान्य माणूस महत्त्वाचा आहे. यासाठी जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी आपले प्राधान्य आहे. मात्र अनेकांना गडबड झाल्याने वेगवेगळी कामे घेऊन येत आहेत. बदल्यांची, गुत्त्यांची कामे सांगितली जात आहेत. मला काही कळत नाही असे समजून चुकीच्या कामात अडकवण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक ठिकाणी गर्दी केली जाते. मग काम कसे होणार? मी अठरा तास काम करते. तुम्ही गावात थांबून लोकांची कामे करा. सार्वजनिक कामातून लोकांना जोडा. आता फुकट पसे मिळवण्याचे दिवस गेले आहेत. मेहनत करूनच पसे कमवावे लागतील. भाजपच्या कार्यकर्त्यांना स्वतच्या पायावर सक्षमपणे उभे करावयाचे आहे. गुत्तेदारीसाठी कोणाच्या दारात जाऊ नये असे मला वाटते. सरकार बदलले की अधिकारी बदलतात. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या भानगडीत कार्यकर्त्यांनी पडू नये. शिस्त पाळावी, उगाच गर्दी करू नये. अनेक वर्षांच्या संघर्षांनंतर सत्ता मिळाली असून सत्ता संयमाने टिकवणे हे कार्यकर्त्यांचे काम असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. या वेळी मोठय़ा संख्येने कार्यकत्रे, पदाधिकारी उपस्थित होते.