सिंधुदुर्गात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत यांच्यात वाद झाल्याने तणाव निर्माण झाला होता. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दोन्ही नेते आमने-सामने आल्यानंतर शाब्दिक वाद झाला. या वादाचे पडसाद बैठक संपल्यानंतरही पाहायला मिळाले. विनायक राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना असताना भाजपा कार्यकर्त्यांनी ‘भाजपाचा विजय असो’, ‘राणे साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणाबाजी सुरु केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बैठकीत काय झालं?

सभेच्या अजेंड्यानुसार बैठक चालावी असं नारायण राणे यांचं म्हणणं होतं. दरम्यान विनायक राऊत यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारचा मुद्दा मांडला. मागील सरकारने घेतलेले सर्व निर्णय सध्याच्या सरकारने रद्द केले असून, त्यावर विचार व्हावा असं ते म्हणाले. नारायण राणे यांनी यावेळी मध्यस्थी करत अजेंड्यावर असणारे विषय आधी घेऊयात असं सांगितलं. त्यावर विनायक राऊत यांनी आक्षेप घेतला. यावर विनायक राऊत यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना ‘ही बैठक नेमकं कोण चालवत आहे?’ अशी विचारणा केली.

भाजपा कार्यकर्त्यांच्या घोषणा

बैठकीनंतर विनायक राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राणेंशी झालेल्या वादावर भाष्य केलं. “मी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचं स्वागत केलं आहे. ते सिंधुदूर्गाचे सुपुत्र आहेत, त्यामुळे त्याचा आनंद आहे. पण सरकारने १२ ऑक्टोबरला एक निवेदन जारी केलं होतं, त्यात त्यांनी सर्व कामांना स्थगिती दिली होती. त्यामुळे हे गतिमान सरकार नव्हे तर ही स्थगिती सरकार आहे. फक्त १० टक्के निधी खर्च झाला आहे. स्थगिती दिल्याने विकासकामांना खीळ घातली जात असल्याच्या अनुषंगाने मी प्रश्न विचारला होता. पण पालकमंत्री उत्तर देण्यास सक्षम असतानाही केंद्रीय मंत्री लुडबूड करत होते. हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे,” असं ते म्हणाले.

विनायक राऊत बोलत असतानाच भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. ‘भाजपाचा विजय असो’, ‘राणे साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा ते देऊ लागले. प्रसारमाध्यमांनी याबद्दल विचारल्यानंतर राऊत म्हणाले, आमच्या घोषणा १० पटीने जास्त आहेत. घोषणा देणारे देतील, आम्ही अशा घोषणांना भीक घालत नाही.

“बैठक नेमकं कोण चालवतंय?,” विनायक राऊतांनी विचारणा करताच नारायण राणे संतापले, बैठकीत जोरदार खडाजंगी

“हे सरकार असंच करत आहे. प्रत्येक ठिकाणी भाषण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करायचा आणि आवाज दाबायचा हेच काम सुरु आहे. सरकारकडून दडपशाहीचं सुरू आहे,” अशी टीका त्यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp activist shout slogans in support of narayan rane while vinayak raut was speaking to media in sindhudurg rno news sgy