राष्ट्रवादीबद्दल काँग्रेस आणि शिवसेनेच्या गोटात संशय

दिगंबर शिंदे, लोकसत्ता 

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असाच सामना रंगतदार वळणावर पोहचला आहे. मात्र, पडद्याआड राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात काही तरी साटेलोटे आहे का या चिंतेने शिवसेनेपेक्षा काँग्रेसच अधिक धास्तावली आहे. गेल्या सहा वर्षांत बँक नफ्यात आली असली तरी या कालावधीत झालेल्या कारभाराचा लेखाजोखा ना सत्ताधारी पॅनेलकडून मांडला जात आहे ना विरोधक असलेल्या भाजपकडून मांडला जात आहे.

सहकारी संस्थामध्ये राजकारण नको असे सांगत पक्षाचे जोडे बँकेबाहेर ठेवून निवडणूक अविरोध करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, सोबतीला जर भाजप असेल तर वेगळा विचार करण्याची तयारी काँग्रेसने इशारा दिला. महाविकास आघाडीतील शिवसेनेला सोबत घेण्याची तयारी काँग्रेसने दाखवली. मात्र, भाजपला विरोध करीत असताना राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी पलूस-कडेगावमधील विधानसभेची गणिते पाहिली. सत्ताधारी पॅनेलचे नेते पालकमंत्री जयंत पाटील यांनी बँकेची सत्तासूत्रे आपल्याकडेच कशी राहतील याची पहिल्यापासून खबरदारी घेतली. आघाडीतील सर्वच पक्षाच्या उमेदवारांची यादी पाहिली तर निर्णयाचे अधिकार आपल्या विश्वासू मंडळीकडेच कसे राहतील याची खबरदारी घेतली असल्याचे दिसते. तसेच आघाडीतील घटक पक्षाचे उमेदवारही आपणास अनुकूल राहतील असेच  निवडण्यात आल्याचे दिसते.

आघाडीच्या तीन जागा अविरोध निवडून आल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर आणि काँग्रेसचे महेंद्र लाड हे अविरोध निवडून आले आहेत. आमदार विक्रम सावंत आणि आमदार मोहनराव कदम, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांना निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. या दिग्गज नेत्यांना अ वर्ग सोसायटी गटातून सहकार विकास पॅनेलच्या माध्यमातून उतरवले आहे. आटपाडी तालुक्यामध्ये शिवसेनेचे तानाजी पाटील आणि भाजपचे राजेंद्र देशमुख यांच्यातील लढत लक्षवेधी होणार आहे, तर जतमध्ये आ. सावंत यांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून मैदानात उतरलेले प्रकाश जमदाडे यांच्याशी निकराची लढत द्यावी लागत आहे.

मर्यादित मतदारसंख्या असल्याने सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे वातावरण दिसत नसले तरी पडद्याआडच्या हालचाली वेगळेच दर्शवत आहेत. त्यातच विरोधकांचा चेहरा असलेले खासदार संजयकाका पाटील यांनी उमेदवारी अंतिम क्षणी काढून घेतल्याने प्रचारात अनपेक्षित शीतलता आली आहे. खासदारांचे राष्ट्रवादीशी साटेलोटे असल्याची वंदता तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी होतीच. या संशयाला बळकटी मिळते की पक्ष धर्म पाळला जातो हे निवडणूक निकालावरून दिसणार आहे.

इतर मागासवर्गीय गटातून आघाडीच्या सहकार विकास पॅनेलने मन्सूर खतीब यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपप्रणीत शेतकरी विकास पॅनेलमधून जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते तमणगोंडा रवी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राखीव गटातील उमेदवाराला सर्व म्हणजे अडीच हजार मतदाराकडून मतदान होणार आहे. यामुळे या ठिकाणीही तीव्र चुरस पाहण्यास मिळत आहे. आर्थिक संस्थांना योग्य दिशा देण्यासाठी आर्थिक साक्षरताही महत्त्वाची आहे. रवि पाटील यांचे शिक्षण एमबीए (फायनान्स) असल्याने त्यांना जर संधी मिळाली तर निश्चितच त्याचे परिणाम बँकेच्या कारभारावर दिसून येतील. तसेच बँकेचे संस्थापक स्व. गुलाबराव पाटील यांचे पुत्र पृथ्वीराज पाटील हेही नागरी पतसंस्था गटातून उमेदवार असून त्यांच्यासोबत कुंडलचे किरण लाड आहेत. त्यांचा सामना राहुल महाडिक आणि अजित चव्हाण यांच्याशी होत आहे. या गटामध्ये मतांच्या फाटाफुटाचा धोका सत्ताधारी पॅनेलला जसा बसू शकतो तशीच अवस्था मजूर संस्था गटातून दिसत आहे. या गटातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि सत्यजित देशमुख यांची लढत हणमंतराव देशमुख आणि सुनील ताटे यांच्याशी होत आहे. यामुळे या दोन गटामध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे.

बँकेचा एनपीए का वाढला, नोकरभरती पारदर्शी झाली का, आधुनिकीकरणावर झालेल्या खर्चाचा लेखाजोखा मांडला जाणार का, बडय़ा थकबाकीदार संस्थावर दाखविण्यात आलेली अवाजवी मेहरबानी याची चर्चा या निवडणुकीत होणे अपेक्षित असताना केवळ सोयीस्कर भूमिका सर्वच पक्ष घेत असल्याचे दिसत आहे. राज्यमंत्री कदम यांनी या वर्मावर नेमके बोट ठेवले आहे.

गेल्या सहा वर्षांतील कारभार काही ठरावीक लोकांना फायदा होईल याच पद्धतीने झाला असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या प्रचार व्यासपीठावरून मिरजेत केला. याचा लेखाजोखा मांडण्याची गरज प्रतिपादन करीत असताना निवडून येणार्याकडून योग्य दिशेने कारभार सुरू आहे का नाही याची दर महिन्याला पडताळणी घेण्याची आवश्यकताही बोलून दाखवली. मात्र, पॅनेलचे नेते पालकमंत्री पाटील यांनी याला बगल देत गेल्या सहा वर्षांत बँक नफ्यात आल्याचे सांगून गौणत्व देण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीवरच पुढील काही दिवसात होत असलेल्या बाजार समिती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अवलंबून असल्याने त्याचीच रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.

सर्वसामान्य शेतकऱ्यांची असलेली बँक शेतकऱ्यांचीच असावी, सहकार चळवळ अधिक तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठी जिल्हा बँकेने दिलेले योगदान मोलाचे आहे. याच बळावर सहकार विकास पॅनेल निवडणुकीला सामोरे जात असून बँक निश्चितच सहकारातील जाणकारांच्या हाती सोपवली जाईल याची खात्री आहे.

– पृथ्वीराज पाटील, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये पक्ष म्हणून न उतरता शेतकरी विकास हा विचार घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहे. यामुळे आम्हाला मदत करणाऱ्यांची पक्षीय अडचण दूर झाली आहे. या निवडणुकीमध्ये धक्कादायक निकाल पाहण्यास मिळतील

– पृथ्वीराज देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष

Story img Loader