सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचार दौऱ्यास गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सकल मराठा समाजाच्या आंदोलकांकडून विरोध होत आहे. गुरुवारी रात्री पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे मराठा आंदोलकांनी त्यांच्या गावभेटीस विरोध करत परत पाठवले. दरम्यान, आपल्याला मराठा समाजाकडून होत असलल्या या विरोधामागे भाजप असल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला असून, भाजपने तो फेटाळून लावत आरोप सिद्ध न केल्यास मतदारसंघात फिरू न देण्याचा इशारा दिला आहे.
आमदार प्रणिती शिंदे या गेल्या काही दिवसांपासून लोकसभेच्या प्रचारासाठी मतदारसंघातील विविध तालुक्यांत फिरत आहेत. या त्यांच्या संपर्क दौऱ्यात मराठा समाजाकडून त्यांना वारंवार विरोध असल्याचे पुढे आले आहे. यापूर्वीही सोलापूर शहरात त्यांच्या निवासस्थानी मराठा आंदोलकांनी मोर्चा काढून घोषणाबाजी केली होती. मंगळवेढा तालुक्यात तसेच मोहोळमध्ये त्यांना आंदोलकांनी रोखण्याचा प्रयत्न केला होता. दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव येथेही मराठा आरक्षण आंदोलकांनी त्यांना गावात प्रवेश नाकारत परत पाठविले होते.
हेही वाचा >>> शिधावाटप केंद्रांवरील ‘सरकारी साडी’ वाटपाला स्थगिती
दरम्यान, काल पंढरपूर तालुक्यातही काही गावांच्या भेटी दरम्यान सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी त्यांना परत पाठवले. विरोध झालेल्या गावांमध्ये सरकोली हे गाव तत्कालीन राष्ट्रवादीचे दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे मूळ गाव आहे. या गावात भाजपचा फारसा प्रभाव नाही. दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांत कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. आपल्याला मराठा समाजाकडून जागोजागी होत असलेल्या या विरोधामागे भाजप असल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे. ‘एक मराठा-लाख मराठा’ अशा घोषणा देत मराठा समाजाचे तरुण आपल्याला विरोध करत असून, काल आपल्या मोटारीवर हल्ला करण्याचाही प्रयत्न झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.
आमदार प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांची भक्कम फळी नाही. त्यांना मराठा समाजातून विरोध होत असताना त्याचे खापर त्या भाजपवर फोडत आहेत. केवळ राजकीय स्टंट म्हणून त्या असे आरोप करत असून आता त्यांनी हे आरोप सिद्ध करावेत, नाही तर माफी मागावी. अन्यथा त्यांना आता मराठा आंदोलकांसोबतच भाजपही मतदारसंघात फिरू देणार नाही.
– माऊली हळणवर, प्रदेश सचिव, भाजप किसान मोर्चा