राज्याच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चा सुरू असलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कालपासून जोरदार राजकीय घडामोडी सुरू होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं म्हटलं होतं. त्यांनंतर आज सकाळपासूनच भाजपाच्या गोटात वेगवाग हालचाली सुरु असल्याचे दिसून येत होते. त्यावरून भाजपा आपला उमेदवार मागे घेणार असल्याचं निश्चित मानलं जात होतं. अखेर भाजपाने या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. मुराजी पटेल हे आता उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. भाजपाच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून तसेच सर्वसामान्यांमधून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत आणि वेगवेगळे अंदाजही लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी भाजपावर टीका केली आहे.
“ ऋतुजा लटके यांना शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज भरायला अडथळे आले. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती दाखवायची होती तर आधीच दाखवायला हवी होती. आता पराभव दिसत असल्याने हे उशिरा आलेलं शहाणपण आहे.! ” असं पटोलेंनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.
हेही वाचा : “… तरी ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर करताना दिलेला त्रास व मानहानी विसरता येणार नाही”
याशिवाय, “ महाराष्ट्रात हे जे काही तडजोडीचं राजकारण सुरू आहे आणि राज्यात भाजपाबद्दल जे चित्र निर्माण झालेलं आहे व देशातही निर्माण होत आहे. आमचे नेते राहुल गांधी यांच्या पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद आपण पाहत आहोत. मोठ्याप्रमाणावर शेतकरी, तरूण, तरूणी, महिलावर्ग त्यांच्योबरोबर जुडला जात आहे. एक अत्याचारी व्यवस्था जी भाजपाच्या रूपाने देशात निर्माण झालेली आहे. त्या व्यवस्थेबद्दल लोकांच्या मनात चीड निर्माण झालेली आहे. त्याचं दर्शन आता आपल्यला सर्व निवडणुकांमध्ये दिसत आहे. लोकांचा कौल आता भाजपा विरोधी झालेला आहे आणि हे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाहायला मिळत आहे. ” अशा शब्दांत नाना पटोले यांनी भाजपावर टीका केली आहे.
या अगोदर नाना पटोलेंनी राज ठाकरे आणि शरद पवारांच्या अंधेरी पोटनिवडणुक बिनविरोध करण्याच्या वक्तव्यावंरून एमसीए निवडणुकीशी आणि अंधेरी पोटनिवडणुकीचा संबंध जोडला होता. “सध्या एक निवडणूक एमसीएची सुरू आहे, पैशांच्या खजिन्याची सुरू आहे. एमसीए म्हटलं तर पैशांचा खजिना. त्यामध्ये जे काही चित्र देशातील आणि राज्यातील लोकांनी पाहीलं आहे. एकीकडे कुठले विरोध होतात ते काही मला माहीत नाही. पण काल दोन्ही नेत्यांनी एकदम बिनविरोध निवडणूक व्हावी, असं जे म्हटलं. त्यामुळे एमसीएच्या राजकारणाचा वास यातून येतोय, असं निश्चितपणे वाटतं.” असं नाना पटोलेंनी म्हटलं होतं.