राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमधध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लोकसत्ताच्या ‘दृष्टी आणि कोन’ या वेबसंवादात सहभागी होत टीका केली. याशिवाय त्यांनी महाउत्सव कार्यक्रमात सहभागी होत आनंद लुटला. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी अमृता फडणवीसांचा उल्लेख न करता टोला लगावला होता. त्यावर अमृता फडणवीसांनी उत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते ?

राज्यातील विविध अधिकाऱ्यांनी आपली कला सादर करावी, यासाठी राज्य सरकारने महाउत्सव या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाक पोलीस कर्मचारी, मंत्रालयीन कर्मचाऱ्यासोबत आयएएस अधिकाऱ्यांनी आपली कला मंचावर सादर केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी अमृता फडणवीसांचं नाव न घेता टोमणा मारला.

“राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे चांगलं गातात असं मला आदित्यने सांगितलं होतं. मला धक्का होता, मला वाटलं होतं आजपर्यंत एकच व्यक्ती गाते, पण बाकीचे सुद्धा गातात,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे अमृता फडणवीसांना टोला लगावला होता.

अमृता फडणवीसांचं उत्तर –

अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे. “मला सुद्धा धक्का होता, मला वाटलं होतं, अब्जाधीश फक्त आपणच आहात, आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा आब्जाधीशच आहे ! छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा कुटुंबात,” असा टोला अमृता फडणवीसांनी लगावला आहे.

दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीसांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “ठाकरे कुटुंबावर बोलल्याशिवाय प्रसिद्धीच मिळत नाही. प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे त्यांचे केविलवाणे प्रयत्न आहेत. आम्ही याकडे फार विनोदी पद्धतीने पाहत आहोत”.

Story img Loader