चंद्रपूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अशी चौरंगी लढत असून भाजप व काँग्रेसला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. शिवसेनेची शक्ती मर्यादित असल्याने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केवळ नावापुरता असल्याने २९ हा बहुमताचा आकडा गाठताना सर्वच पक्षांची दमछाक होणार आहे.
जिल्हा परिषदेत ५६ जागांवर ३३१ व पंचायत समितीच्या १२२ जागांवर ५६३, असे एकूण ८९४ उमेदवार रिंगणात आहेत. सध्या जि.प.मध्ये असलेली सत्ता टिकवून ठेवण्याचे आवाहन भाजपचे नेते म्हणून अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यावर आहे. मात्र, बहुतांश मतदारसंघात भाजपला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे, तर काही क्षेत्रांत राष्ट्रवादी व काँग्रेसमधून आयात केलेले उमेदवारांना भाजपने उमेदवारी दिल्याने निष्ठावंतांच्या वर्तुळात नाराजी आहे. ती दूर करण्यासोबतच स्वपक्षीय उमेदवारांना विजयी करण्याचे मोठे आवाहन भाजपच्या या दोन्ही मंत्र्यांसमोर आहे. पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या चिंतलधाबा-घोसरी जि.प. क्षेत्रात त्यांचे कट्टर समर्थक व घुग्घुस येथून खास निवडणुकीसाठी आयात केलेले विद्यमान बांधकाम सभापती देवराव भोंगळेंविरुद्ध काँग्रेसचे विद्यमान जि.प. सदस्य विनोद अहिरकर यांच्यात सरळ लढत आहे. तसेच देवाडा-केमारा येथून जि.प.चे माजी अध्यक्ष व काँग्रेस उमेदवार प्रकाश पाटील मारकवारांविरुद्ध भाजपचे संतोषवार यांच्यात सामना आहे. बल्लारपूर व मूल तालुक्यातही भाजप विरुद्ध काँग्रेस, अशी सरळ लढत असल्याने मुनगंटीवार आपल्याच मतदारसंघात अडकून पडले आहेत. मारोडा-राजोली क्षेत्रात भाजपच्या विद्यमान जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले व काँग्रेसच्या वैशाली पुल्लावार यांच्यात लढाई आहे.
राजुरा विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार अॅड. संजय धोटेंविरुद्ध काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे व शेतकरी संघटनेचे माजी आमदार अॅड. वामनराव चटप, असा तिहेरी सामना रंगला आहे. राजुरा क्षेत्रात आमदार भाजपचा असला तरी ग्रामीण क्षेत्रावर काँग्रेस व शेतकरी संघटनेचे वर्चस्व असल्याने आमदार अॅड. धोटे यांना परिस्थिती कठीण आहे. त्यामुळे धोटे-चटप-अॅड. धोटे याच क्षेत्रात अडकून पडले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा