मुंबईतली जी मजार हटवण्यात आली ती मजार जर अनधिकृत असेल तर त्याचा विरोध केलाच पाहिजे मी त्या कारवाईचं स्वागत करतो असं एमआयमचे नेते इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की माहीमसारख्या ठिकाणी एक मजार, दर्गा उभा राहतो आणि राज ठाकरे त्याचे व्हिडीओ दाखवतात आणि १२ तासांच्या आत कारवाई होते. यावरून हे स्पष्ट होतं की देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीने राज ठाकरेंना क्लू दिला होता. तुझ्या सभेत तू घोषणा कर मी एक महिन्याच अल्टिमेटम देतो वगैरे. त्यानंतर बारा तासात कारवाई होते. राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे कसे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रात्री ते बोलले आणि सकाळी कारवाई होते यातून हेच दिसतं आहे असंही जलील यांनी म्हटलं आहे.
आणखी काय म्हटलं आहे इम्तियाज जलील यांनी?
राज ठाकरेंच्या सभेला जे कार्यकर्ते आले होते त्यांना एक संदेश जाणं गरजेचं होतं की बघा राजसाहेब किती मोठे आहेत. ज्यांनी एक अल्टिमेटम दिला आणि लगेच कारवाई झाली. यातून एक माहोल तयार केला जातो आणि उद्धव ठाकरेंना कसं डावलायचं आहे हे यातून समोर येतं आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या असं जलील यांनी म्हटलं आहे.मनसे, भाजपा, शिंदे गटाची शिवसेना यांना उद्धव ठाकरेंना संपवायचं आहे त्यामुळेच ही खेळी खेळली गेली. यामागे भाजपा आहे हे मी २०० टक्के खात्रीने सांगतो असंही जलील यांनी म्हटलं आहे.
भाजपाला पक्कं ठाऊक आहे की…
सत्ता असताना आपण हिंदू-मुस्लिमांना आपसात लढवू शकत नाही हे शिंदे फडणवीसांना माहित आहे. त्यामुळेच राज ठाकरेंच्या माध्यमातून हे केलं जातं आहे असाही आरोप जलील यांनी केला. खुलेपणाने मुस्लिमांना विरोध करता येणार नाही हे भाजपाला माहित आहे. राज ठाकरेंसारख्या बाहुल्यांकडून हे करून घेता येतं. एक वर्षापूर्वी राज ठाकरे औरंगाबादला आले होते. मशिदींवरचे भोंगे काढा, नाहीतर हे करू ते करू गर्जना केल्या. त्यानंतर वर्षभर गप्प बसले. आता रमझान आल्यावर पुन्हा हिंदू मुस्लिम यांना लढवायचं. पुन्हा एक माहोल तयार करायचा हे सगळं आता लोकांना समजतं. तुम्ही मुद्दा काढला तर लोक विचारणार की इतके दिवस पोलीस झोपले होते का? प्रशासन काय करत होतं? अनधिकृत काही असेल तर कुठल्याही पक्षाच्या नेत्याने तुम्हाला आठवण का करू द्यावी लागते? घटनेला मानणाऱ्या मुस्लिमांना मी मानतो हे ते म्हणाले हे विचारणारे राज ठाकरे कोण? असाही प्रश्न इम्तियाज जलील यांनी विचारलं आहे. हे काहीही करून राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपेक्षा मोठं करायचं आहे असंही जलील यांनी म्हटलं आहे. इम्तियाज जलील यांनी टिव्ही ९ मराठीशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं आहे.