आगामी कोल्हापूर महापालिका निवडणुकीत शिवसेनेशी युती होणे आता अशक्य आहे, अशा शब्दात सहकार तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी शिवसेनेच्या वरिष्ठांकडून आलेला युतीचा प्रस्ताव फेटाळून लावला. यामुळे पालकमंत्र्यांवर टोकाच्या भाषेत शरसंधान करणाऱ्या शिवसेनेला धनुष्यबाण घेऊन एकाकी लढत द्यावी लागणार आहे. तर, भाजपा ताराराणी आघाडीसोबत निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाला असल्याचे स्पष्ट झाले.
महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजप-शिवसेनेच्या युतीवरून संभ्रमाचे वातावरण राहिले. दोन्ही पक्षांनी परस्परांशी युती करणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. तथापि या आठवडय़ात शिवसेनेचे खासदार अरिवद सावंत यांनी करवीर नगरीतील एका कार्यक्रमात भाजपाच्या वरिष्ठांशी सुरू असलेल्या चच्रेचे संकेत देऊन केंद्र व राज्य शासनाच्या सत्तेत असलेले दोन्ही पक्ष महापालिकेच्या आखाडयात परस्परांविरोधात लढण्याऐवजी एकत्रित लढतील, असे सूचित केले होते. त्यावरून पुन्हा एकदा धनुष्यबाण व कमळ एकत्रित नांदणार या चर्चेना वेग आला होता. मात्र या चच्रेला पालकमंत्र्यांनी आज पूर्णविराम दिला.
चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सत्तेत असलेल्या भाजपा व शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढवावी हा विचार योग्य असला तरी आता वेळ निघून गेली आहे. खासदार राऊत यांची भूमिका योग्य असली तरी व्यावहारिक स्थिती पाहता भाजप व ताराराणी आघाडी यांच्यातील युतीची प्रगती पुढच्या टप्प्यावर गेली आहे. दोघांना किती जागा द्यायच्या, त्यासाठी त्यांनी प्रभागातील उमेदवार कोणते निवडायचे या बाबी जवळपास निश्चित झाल्या आहेत. अशात दोघात तिसरा आल्याने वांदे होऊ शकतात. निश्चित झालेला उमेदवार ऐनवेळी बदलला जाणे योग्य ठरणार नाही त्यामुळे चुकीचा संदेश मतदारांमध्ये जाऊ शकतो. शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, पण हीन भाषेत टीका करण्याचे टाळावे, असा सल्ला देण्यासही सहकारमंत्री विसरले नाहीत.
केंद्रात व राज्यात भाजप शिवसेनेची युती आहे. दोन्हीकडे हे पक्ष सत्तेतही आहेत. मात्र स्थानिक पातळीवरील निवडणूक कशी लढवावी याचा निर्णय भाजपाने स्थानिक पातळीवरील नेतृत्वाकडे सोपवला आहे. दोन्ही पक्षांनी विभक्तपणे निवडणूक लढविल्याची उदाहरणे यापूर्वीही आहेत, असा निर्वाळाही पाटील यांनी दिला.
शिवसेनेशी युती होणे अशक्य
आगामी कोल्हापूर महापालिका निवडणुकीत शिवसेनेशी युती होणे आता अशक्य आहे, अशा शब्दात सहकार तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी शिवसेनेच्या वरिष्ठांकडून आलेला युतीचा प्रस्ताव फेटाळून लावला.
First published on: 29-08-2015 at 04:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp and shiv sena alliance became impossible