शिवसेना आणि भाजपाची युती होणार की नाही याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेना आणि भाजपातील बेबनावाचा खरपूस समाचार घेतला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे युती गेली खड्डयात म्हणत आहेत आणि दुसरीकडे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह ‘उठा के पटक देंगे’ बोलत आहेत. एकंदरीत दोन्ही अध्यक्ष महाराष्ट्राचे मनोरंजन करत आहेत. हे मनोरंजन आणि त्यांचा सुरु असलेला हा तमाशा किती दिवस चालणार आहे. यांचा अंतिम शो होणार की मनोरंजनच सुरुच राहणार असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.
शिवसेना मंदिराचा मुद्दा घेवून अयोध्येत आणि मग पंढरपूरला गेली. मंदिरावर बोलत असताना उध्दव ठाकरे यांनी युती गेली खड्डयात असे स्पष्ट केले होते आणि काल लातूरमध्ये भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी कार्यकर्त्यांशी बोलत असताना मित्रपक्ष सोबत येत असतील तर ठीक नाहीतर उठा के पटक देंगे असे भाष्य केले होते…त्यामुळे महाराष्ट्रात एक लॉरेन आणि हार्डी ही दोन पात्रं लोकांचे मनोरंजन करत आहे, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.
या दोन्ही पक्षांनी कितीही तमाशा केला एकत्र लढले की वेगवेगळे लढले तरी आता महाराष्ट्रामधील लोकांच्या मनामध्ये दोन्ही पक्षाच्याबाबतीत राग आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एक परिवर्तन घडून आले पाहिजे अशी मानसिकता लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. परिणामी लोकसभेमध्ये आमच्या आघाडीला जास्तीत जास्त जागा मिळतील यात शंका नाही अशी आशा नवाब मलिक यांनी व्यक्त केली.