राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला. यानंतर त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेनेचे (शिंदे गट) नेते व मंत्री उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. बावनकुळेंनी नियमांचं पालन झालं नसल्याने राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्याचं म्हटलं, तर सामंत यांनी यावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असल्याचं म्हटलं.
चंद्रेशखर बावनकुळे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार अपेक्षित मतं मिळवली नसतील किंवा नियम पूर्ण केला नसेल म्हणून त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाला असेल. मी तर दिवसभरात प्रवासात होतो. शेतकऱ्यांच्या शेतात चाललो आहे. मला माध्यमांकडूनच हे कळालं.”
“…म्हणून त्यांची मान्यता रद्द झाली असेल”
“राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे मतं घ्यावी लागतात. त्यांनी ते नियम पाळले नसतील किंवा त्यात ते कमी पडले असतील. म्हणून त्यांची मान्यता रद्द झाली असेल,” असं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं.
“मला वाटतं हा आजच निर्णय झालेला नाही”
दुसरीकडे शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत म्हणाले, “मला वाटतं हा आजच निर्णय झालेला नाही. यावर कित्येक दिवस निवडणूक आयोगात चर्चा सुरू होती. फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचाच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढलेला नाही, तर तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट पक्षाचंही त्यात नाव आहे.”
हेही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; निवडणूक आयोगाकडून NCPसह ‘या’ तीन पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द
“निवडणूक आयोगाचे काही निकष आहेत”
“‘आप’ पक्षाला नव्याने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाचे काही निकष आहेत आणि त्यात काही पक्ष बसले नसतील म्हणून मान्यता रद्द झाली असेल,” असंही उदय सामंत यांनी नमूद केलं.