रत्नागिरी : रत्नागिरीत विधानसभा मतदारसंघात परिवर्तन करण्यासाठी महायुतीतील भाजपा आणि शिवसेना ठाकरे गट  हातात हात घालून कामाला लागणार आहे. याबाबत आता खलबते सुरु झाली आहेत. रत्नागिरीत एक सक्षम उमेदवार दिला पाहिजे या मुद्द्यावर ठाकरे गटाचे नेते राजेंद्र महाडिक व उदय बने यांच्याशी माजी आमदार बाळ माने यांची बंद दाराआड  चर्चा झाली आहे. यामुळे रत्नागिरी मतदारसंघात उदय सामंत यांच्यासमोर सक्षम पर्याय देऊन परिवर्तन करण्याबाबत ठाकरे गटाचे मनसुबे आहेत. याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही याला बळ देण्याची ग्वाही दिल्याचे समजते. त्यामुळे मातोश्रींचा आदेश ठाकरे  गटाला मानावाच लागणार आहे.

हेही वाचा >>> Laxman Dhoble : “अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून मी भाजपा सोडतो आहे”, माजी मंत्र्यांची घोषणा! आता हाती घेणार तुतारी

निवडणुकीच्या युद्धात सर्वच गोष्टी उघड करायच्या नसतात, असेही एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे. शिवसेना-भाजप युती २०१४ मध्ये तुटली आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून अचानक शिवसेनेच्या गोटात दाखल झालेल्या उदय सामंत यांनी रत्नागिरीत विजय मिळवला. यामुळे धनुष्यबाणाचा पहिलाच आमदार झाला. २०१९ मध्ये भाजप-सेना युतीमुळे सामंत पुन्हा आमदार झाले. त्यानंतर युती तुटली आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यावेळी रत्नागिरी शिवसेना अभेद्य होती.

अडीच वर्षांत राज्यात भूकंप झाला आणि शिवसेना फुटली. यात उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. रत्नागिरीतील काही पदाधिकाऱ्यांनी सामंत यांच्यासोबत काही पदाधिकारी, कार्यकर्ते गेले. परंतु आजही ठाकरे शिवेसेना कणखर आहे व मातोश्रीसोबत एकनिष्ठ असल्याचे लोकसभा निवडणुकीत हे दिसून आले आणि उमेदवार विनायक राऊत यांना दहा ते बारा हजारांचे लीड मिळाले.

हेही वाचा >>> Zeeshan Siddique : झिशान सिद्दीकी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर, राजकीय वर्तुळात ‘या’ चर्चांना उधाण

आता विधानसभेच्या निवडणुकीत तीन वेळा पराभव पचवून पुन्हा एकदा बाळ माने निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहेत. त्यांच्यासमेवत तीन पर्याय आहेत. परंतु रत्नागिरीत सक्षम उमेदवार हवा याकरिता त्यांनी व्यूहरचना केली आहे. २५ वर्षांच्या युतीमुळे ठाकरे गटातील अनेकांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. यातूनच ते ठाकरे गटात प्रवेश करू शकतात, भाजपातच राहून आणखी काही वेगळा निर्णय घेऊ शकतात किंवा अपक्ष उभे राहण्याचा पर्याय त्यांच्यासमोर आहे. ठाकरे गटामधील इच्छुक राजेंद्र महाडिक, उदय बने यांच्याशी बाळ माने यांची बंद दाराआड चर्चा झाली आहे. त्यामुळे परिवर्तनासाठी कोणता निर्णय होईल, हे आगामी काही दिवसांतच कळणार आहे. दबावतंत्र, साम-दामचा उपयोग करणे, विरोधकांना त्रास देणे सत्ताधारी पक्षालाही सोबत न घेणे अशा अनेक चुका प्रस्थापितांनी केल्या आहेत. विरोध करण्यासाठी सुद्धा शत्रूला शिल्लक ठेवायचे नाही, या नीतीमुळे आता रत्नागिरीत परिवर्तनासाठी माने-बने आणि महाडिक यांना कोण साथ देणार अशी चर्चा येथील मतदार संघात सुरू झाली आहे.