Maharashtra MLC by-poll election BJP Candidate List : भारतीय जनता पार्टीने विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. विधान परिषदेत भाजपाच्या वाट्याला तीन जागा येणार हे निश्चित आहे. विधान परिषदेच्या जागांसाठी अर्ज भरण्याचा उद्या (सोमवार, १७ मार्च) अखेरचा दिवस आहे. तत्पूर्वी, भाजपाने त्यांच्या तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये संदीप जोशी, संजय केनेकर व दादाराव केचे यांचा समावेश आहे.
महायुती व महाविकास आघाडी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात कोणकोणत्या उमेदवारांना उतरवणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात होते. ज्यांना विधानसभेवर जाण्याची संधी मिळाली नव्हती असे भाजपा नेते व प्रवक्ते विधान परिषदेची उमेदवारी मिळावी उत्सूक होते. अशातच, आता भाजपाने त्यांची उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
दरम्यान, भाजपाने जाहीर केलेल्या यादीवर मुख्यमंत्री व महाराष्ट्र भाजपाचा चेहरा असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव दिसत आहे. कारण हे तिन्ही उमेदवार फडणवीसांच्या जवळचे मानले जातात.
भाजपाला तीन तर शिवसेना-राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळणार
विधान परिषदेवरील पाच आमदारांची विधानसभेवर निवड झाल्याने रिक्त झालेल्या या पाच जागांसाठी २७ मार्च रोजी पोटनिवडणूक होणार आहे. प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र पोटनिवडणूक होणार असल्याने पाचही जागा महायुतीला मिळणार आहेत. भाजपला तीन तर शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादीला (अजित पवार) प्रत्येकी एक जागा मिळेल. नियमानुसार, एकापेक्षा अधिक जागांसाठी पोटनिवडणूक होणार असल्यास प्रत्येक जागा ही स्वंतत्र मानली जाते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या अखेरचा दिवस
विधान परिषद सदस्याची लोकसभा अथवा विधानसभेवर निवड झाल्यास त्याचे विधान परिषद सदस्यत्व आपोआपच रद्द होते. प्रवीण दटके (भाजपा), रमेश कराड (भाजपा), गोपीचंद पडाळकर (भाजपा), राजेश विटेकर (राष्ट्रवादी – अजित पवार), आमश्या पाडवी (शिवसेना – एकनाथ शिंदे ) या विधान परिषदेच्या पाच आमदारांची विधानसभेवर निवड झाली आहे. त्यामुळे पाचही जणांची आमदारकी संपुष्टात आली. त्यामुळे या पाच जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. १० ते १७ मार्च या काळात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून उद्या ही मुदत संपत आहे.