विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघ केंद्रस्थानी आलेला आहे. या जागेसाठी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना माहाविकास आघाडीने पाठिंबा दिलेला आहे. तांबे यांना भाजपा पक्ष पाठिंबा देणार असे म्हटले जात होते. मात्र अद्याप त्याबाबत घोषणा करण्यात आली नव्हती. असे असतानाच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. ते आज (२९ जानेवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
सर्व कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला
विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी भाजपा पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला आहे. याबाबतची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या पातळीवर हा निर्णय झाल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. “आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कार्यकर्त्यांच्या पातळीवर झालेला आहे. सत्यजित तांबे तरुण आहेत. होतकरू आहेत. त्यांना संधी दिली पाहिजे. म्हणूनच आमच्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे,” असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा >> बाळासाहेब ठाकरे की आनंद दिघे, धक्कातंत्र कोणी शिकवलं? एकनाथ शिंदेंनी दिलं खास उत्तर; म्हणाले, “खरा धक्का…”
सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत होणार
दरम्यान, विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे यांच्यात थेट लढत होणार आहे. त्यामुळे या जागेवर कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.