BJP Leader Ravindra Chavan appointed Maharashtra region in charge : भारतीय जनता पार्टीने सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावीत, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला असून रवींद्र चव्हाण यांची लवकरच प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याचे सांगितले जात होते. चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे-पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करून समन्वय राखण्याचा भाजपाने प्रयत्न केला आहे. भाजपाने मुंबईतून लोढा व शेलार या दोघांनाच कॅबिनेटमध्ये संधी दिली आहे. दरम्यान, भाजपाने रवींद्र चव्हाण यांना भाजपाच्या प्रदेश प्रभारी पदावर नियुक्ती केली आहे. पक्षाने राज्यातील वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाही केल्या असून मंत्री आशिष शेलार यांनी याबाबतची माहिती एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे.
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणित महायुतीने प्रचंड मोठा विजय मिळवला. त्यानंतर दोन आठवड्यांनी महायुतीने राज्यात सरकारस्थापन केलं व मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यावेळी भाजपाने मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी देताना काही ज्येष्ठ मंत्र्यांना वगळलं. चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील नेते असून त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांच्याकडे गेल्या वर्षभरापासून पक्षसंघटनेतही जबाबदारी देण्यात आली होती आणि कोकणसह राज्यभरात त्यांनी अनेक दौरे केले होते. बावनकुळे यांची प्रदेश अध्यक्षपदाची मुदत ऑगस्ट २०२५ पर्यंत असली तरी त्यांना मंत्रीपद देण्यात आल्याने ‘एक व्यक्ती, एक पद’ या न्यायाने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अन्य ज्येष्ठ नेत्याकडे दिली जाईल, असं म्हटलं जात होतं.
हे ही वाचा >> प्रकाश आंबेडकरांनी घेतली फडणवीसांची भेट, दोघांमध्ये तासभर चर्चा, कोणत्या मागण्या मान्य केल्या?
रवींद्र चव्हाणांचं पुनर्वसन?
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यांमध्ये होण्याची शक्यता असल्याने नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती लवकरच केली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. भाजपाचे प्रदेश अधिवेशन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत १२ जानेवारी रोजी शिर्डीत होणार असून त्यात चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, भाजपाने तुर्तास चव्हाण यांची भाजपा प्रदेश प्रभारी पदावर नियुक्त केली आहे.
मागील ३० वर्षांच्या राजकीय कार्यकाळात प्रत्येक वेळी मुंबई शहराच्या उंबरठ्यावरील सुशिक्षित, मध्यमवर्गीयांचे शहर म्हणून डोंबिवली शहराला सत्ताधारी पक्षाने मंत्रिपदाची संधी दिली. यापूर्वी भाजपाचे राम कापसे, काँग्रेसचे नकुल पाटील, भाजपाचे जगन्नाथ पाटील यांनी या शहराचे नेतृत्व केले. मागील तीन वर्षांपासन रवींद्र चव्हाण यांनी अन्न आणि नागरी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम विभागाची मंत्रिपदे भूषवली. मात्र यावेळी सत्ताधाऱ्यांनी मंत्रिमंडळात डोंबिवलीला स्थान दिलेलं नाही.