नांदेड:  राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या धामधुमीतच भाजपाच्या प्रदेश कार्यालयाने पक्षाच्या ७८ संघटनात्मक जिल्ह्यांतील निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. नांदेड जिल्ह्यातील प्रक्रियेत नव्यांना स्थान न देता जुन्या-निष्ठावान कार्यकर्त्यांना निवडणुका पार पाडण्याचा मान देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोळा तालुक्यांत पसरलेल्या नांदेड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागासाठी उत्तर व दक्षिण नांदेड हे दोन स्वतंत्र संघटनात्मक जिल्हे असून त्यांतील निवडणुकीची जबाबदारी अनुक्रमे चैतन्यबापू देशमुख व रामराव केंद्रे या अनुभवी कार्यकर्त्यांवर तर नांदेड महानगरमधील जबाबदारी परभणीच्या प्रमोद वाकोडकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या निवडणुकीच्या अधिकार्‍यांना प्रथम १० ते २० मार्च दरम्यान बूथ अध्यक्षांची आणि नंतर ३० मार्चपर्यंत मंडल अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले असले, तरी पक्षस्तरावर मंडल समित्यांच्या पुनर्रचनेचा विषय विचाराधीन आहे, पण तो अंतिम होण्यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली.

पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीच्या संदर्भाने विभागीय संघटनमंत्र्यांनी गेल्या शनिवारी सर्व संबंधितांची बैठक नांदेडमध्ये घेतली. त्यात आवश्यक ते नियोजन करण्यात आले. सुमारे ५ वर्षांपूर्वी पक्षाच्या संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेत तत्कालीन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा प्रभाव दिसला होता. आता नांदेड उत्तर जिल्ह्यातल्या संघटनात्मक निवडणुकीत खा.अशोक चव्हाण यांचा गट आणि पक्षाचे जुने कार्यकर्ते यांच्यात समन्वय राखला जातो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मागील वर्षी भाजपामध्ये प्रवेश केला. त्याआधी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद भूषविले होते. तसेच नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संघटनेत त्यांचे एकहाती निर्विवाद वर्चस्व प्रदीर्घकाळ दिसून आले. पण भाजपात आल्यानंतर त्यांना नांदेड जिल्ह्याच्या पक्ष संघटनेत आतापर्यंत महत्त्व दिले गेले नाही. ते भाजपामध्ये आल्यावर प्रथमच पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका होत असून भोकर, मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यातील मंडळ अध्यक्ष निवडणुकांत त्यांच्या गटाला किती वाव मिळणार, ते पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.

भाजपाच्या नांदेड दक्षिण जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात आठ तालुके व पक्षाचे तीन आमदार आहेत. मागील काही वर्षे डॉ.संतुक हंबर्डे यांनी या संघटनात्मक जिल्ह्याचे अध्यक्षपद भूषविले. त्यांच्या जागी आता कोणाला पसंती दिली जाते, याकडे संबंधितांचे लक्ष असले, तरी नांदेड उत्तर जिल्ह्याचे अध्यक्षपद कोणाला मिळणार, याबद्दल अधिक उत्सुकता आहे. हे जिल्हाध्यक्षपद माहूर-किनवट भागाकडे दिले जावे, यासाठी आ.भीमराव केराम आग्रही असल्याचे सांगण्यात आले.

पक्षसंघटनेत मंडल अध्यक्षास बरेच महत्त्व आहे. राज्याच्या निवडणूक अधिकार्‍यांनी बूथ समितीसह मंडल समितीची रचना कशी करावी हे सर्व जिल्ह्यांच्या निवडणूक अधिकार्‍यांना कळविले असून नांदेड जिल्ह्यातील तीनही निवडणूक अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात कार्यरत झाले आहेत. चैतन्यबापू देशमुख यांनी रविवारी मुदखेड येथे संबंधितांची कार्यशाळा घेतली. जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपाच्या पक्षसंघटनेतील मंडल समित्यांची पुनर्रचना करण्याची प्रक्रियाही प्रदेश कार्यालयाच्या स्तरावर सुरू आहे. ६० ते १०० बूथ समित्यांमागे एक मंडल समिती करण्याचा विचार पक्षामध्ये सुरू आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याआधी मंडल समित्यांची पुनर्रचना अंतिम करण्यात येणार असून त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना निवडणूक अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत; पण पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान पूर्ण होण्याआधीच निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.