शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा मोर्चा विधानभवनावर धडकला. राज्याच्या विविध भागातील ४० ते ५० हजार शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. या विराट मोर्चाने शहर दुमदुमले आणि वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली.  
कापूस व धानाला भाव मिळावा, भारनियमन बंद करावे, ग्रामीण भागातील स्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे आणि तीन टक्के व्याजदरावर नव्याने कर्ज द्यावे,   शेतकऱ्यांना कृषीपंपाची जोडणी करून द्यावी, गडचिरोलीतील आदिवासींचे दारिद्रय़ रेषेखालील रेशनकार्ड तात्काळ परत करण्यात यावे, निराधारांच्या योजनेतील मानधन त्यांच्या खात्यात १ तारखेलाच जमा करण्यात यावे, सात बारा कोरा करण्यात यावा आदी मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा आयोजित करण्यात आला.
आज सकाळपासून राज्यातील विविध भागातील शेतकरी व पक्षाचे कार्यकर्ते वेगवेगळ्या गाडय़ांनी रेशीमबाग मैदानात जमू लागले. सायकल आणि स्कूटर मिरवणुकीने हजरो कार्यकर्ते नागपुरात पोहोचले. दुपारी २ वाजता प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली रेशीमबाग मैदानातून मोर्चाला प्रारंभ झाला. रेशीमबाग चौक, सी. पी. अ‍ॅन्ड बेरार कॉलेज, महाल, शुक्रवार तलाव, कॉटेन मार्केट, मुंजे चौक, झाशी राणी चौक मार्गे निघालेला मोर्चा टी पॉईंटजवळ अडविण्यात आला. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर मोर्चेकऱ्यांचे स्वागत करण्यात आले.
मोर्चामध्ये धान, कापूस, ऊसाने सजवून किसान रथ तयार करण्यात आला होता. या रथामध्ये नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, पांडुरंग फुंडकर, विनोद तावडे, खुशाल बोपचे, सुरेश वाघमारे, नाना पटोले, चैनसुख संचेती, नीता केळेकर आदी नेते उपस्थित होते. सरकारच्या विरोधात घोषणा देत असताना ढोल ताशांच्या निनादावर शेतकरी गाणी गात होते. हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज आणि झाशीच्या राणीची वेशभूषा करीत कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. काही कार्यकर्ते कापसाचा हार घालून होते. भाजपचा नारा सातबारा कोरा, काँग्रेस सरकार खात आहे तुपाशी, शेतकरी आहे उपाशी, ना भाकरी न रक्षा, कोण करेल आमची सुरक्षा, अजित पवार हटाव, सिंचन घोटाळ्याची चौकशी करा, भारतीय जनता पक्षाचा विजय असो आदी घोषणांमुळे परिसर दुमदुमन गेला होता. टी पॉईंटकडून व्हरायटी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर आणि पुलावर लोक बसले होते. टी पॉईंटकडे येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले होते. या मोर्चामुळे पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला होता. भारतीय जनता पक्षाचे नेते पाशा पटेल यांनी प्रारंभी भाषण करून सरकारवर सडेतोड टीका केली. मोर्चात आलेल्या लोकांना खाली बसण्याचे आवाहन करीत असताना काँग्रेससारखे बेशिस्त वागू राहू नका, अशी टीका केली.
सभेत नितीन गडकरी यांच्यासह गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, विनोद तावडे आदी नेत्यांची भाषणे झाली. मोर्चाच्या मार्गावर झालेल्या गर्दीमुळे पोलिसांना फारच कसरत करावी लागली. शहरातील विविध भागात झालेल्या गर्दीचा फटका अनेक लोकांना बसला आणि वाहतूक विस्कळीत झाली होती.     
चोख व्यवस्था
भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर काढण्यात आलेल्या मोर्चात राज्यातील विविध भागातील ३० ते ४० हजार शेतकरी आणि कार्यकर्ते आले असताना स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यवस्था विस्कळीत होऊ  नये याची पूरेपूर काळजी घेतली. बाहेरगावावरून आलेल्या शेतकरी आणि कार्यकर्त्यांसाठी भोजन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मैदानावर पक्षाचे प्रवक्ते गिरीश व्यास कार्यकर्त्यांना सूचना देत होते, त्याप्रमाणे साहित्याचे वाटप केले जात होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा