मुंबईत आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. गेल्या महिन्याभरात ठिकठिकाणी मविआच्या सभा झाल्या आहेत. त्यातील झालेली आणि न झालेली भाषणं यावरून बरीच राजकीय चर्चा आणि टीका-टिप्पणी झाल्यानंतर आज महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच मुंबईत मविआची सभा होत आहे. मात्र, या सभेसाठी वांद्र्यातील बीकेसीमधल्या नरे पार्कची निवड करण्यात आली आहे. शिवाजी पार्कसारखं मोठं मैदान न घेता नरे पार्कची निवड केल्यावरून सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जात आहे. यासंदर्भात भाजपा आमदार आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी खोचक टीका केली आहे.
बीकेसीमधील नरे पार्कमध्ये आज सभा होणार आहे. या सभेत ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत बोलणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तर काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व भाई जगताप भाषण करणार असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर या सभेतही तिन्ही पक्षांकडून सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटावर हल्लाबोल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
आशिष शेलारांची टीका
दरम्यान, या सभेवर आशिष शेलार यांनी टीकास्र सोडलं आहे. “मविआची वज्रमूठ सभा आज मुंबईत होतेय. मूठभर मैदान आणि मूठभर संख्या, आवाज मात्र मोठा. मैदान छोटे, आकडे खोटे आणि संजय राऊतांचे भोंगे मोठे. आवाज मोठा असला, तरी लोक जमा करण्यात सपशेल फेल ठरणारी ही सभा छोटं मैदान घेऊन मोठी संख्या दाखवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेच मविआला मुंबईत जनसमर्थनच नाही आणि म्हणून छोटं मैदान घ्यावं लागलं असा जनतेचा समज आहे”, असं शेलार म्हणाले.
“भविष्यात नरे पार्कातच सभा होतील!”
दरम्यान, आशिष शेलार यांनी यांदर्भात ट्वीट करूनही प्रतिक्रिया दिली आहे. “जे मैदान ग्राहकोपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनालाही कमी पडते, एकट्या भाजपाची सभा असते तेव्हा व्यवस्थेला जे मैदान वापरावे लागते अशा बीकेसीतील सर्वात छोट्या मैदानात तीन पक्षांची सभा होत आहे. ही वज्रमूठ? उबाठाचा प्रवास ईश्वरनिष्ठांकडून कम्युनिस्टांकडे असल्याने भविष्यात नरे पार्कातच सभा होतील असं वाटतंय”, असं आशिष शेलार आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहेत.