ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी खेड येथे झालेल्या सभेमध्ये महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गट यांच्यावर तोंडसुख घेतलं. तसेच, “आम्हाला देशद्रोही म्हणण्याची त्यांची हिंमत नाही, नाहीतर जीभ हासडून हातात देईन, आम्ही देशद्रोही नसून देशभक्त आहोत”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला लक्ष्य केलं होतं. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटू लागले असून त्यावर आता भाजपा आमदार आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शेलक्या शब्दांमध्ये टोला लगावला आहे. आपल्या ट्वीटमध्ये आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंची तुलना शोले चित्रपटातील असरानींच्या जेलर या व्यक्तिरेखेशी केल्याचं बोललं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ढेकणं चिरडायला गोळीबाराची गरज नाही – उद्धव ठाकरे

“निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. मैदानाचे नावं चांगलं आहे, गोळीबार मैदान. पण, ही ढेगणं चिरडायला गोळीबाराची गरज नाही. तुमचे एक बोट मतदानाच्या दिवशी यांना संपवेल. ज्यांना आपलं कुटुंब मानलं, त्यांनी आपल्यावर वार केले”, असं उद्धव ठाकरे खेडमधील भाषणात म्हणाले.

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या भाषणातील टीकेवर आशिष शेलार यांनी ट्वीटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे. या ट्वीटमध्ये आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंची तुलना ‘शोले’ चित्रपटातील असरानींच्या जेलर या व्यक्तिरेखेशी केल्याचं दिसत आहे. असरानींचा एक संवाद आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावण्यासाठी वापरला आहे.

“कोकणात शिमगा असल्याने जनता…”

“पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावून ज्यांनी महाराष्ट्रात मतं मिळवली आणि नंतर गद्दारी केली, तेच आज आम्हाला मोदींच्या फोटोवरून आव्हान देतात? कोकणात शिमगा असल्याने जनता फारसे गांभीर्याने घेणार नाही. कालच्या सभेतील सोंगांनी आणि बोंबा मारायच्या कार्यक्रमाने मनोरंजन झाले”, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

“भुरटे, गद्दार आणि तोतये नाव चोरू शकतात, पण…”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

“अकेले असरानी बच गए…”

“आधे इथर गए…आधे उधर गए.. अकेले असरानी पच गए.. आता महाराष्ट्रात ‘असरानी’ जिथे जिथे फिरतील, तिथे तुफान मनोरंजन होणार!” असा टोला आशिष शेलार यांनी आपल्या ट्वीटमधून लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp ashish shelar mocks uddhav thackeray speech khed shivsena pmw