शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांसहित मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेमुळे भाजपा नेते आशिष शेलार यांनी संताप व्यक्त केला आहे. ट्रेलर दणक्यात असतो, पिक्चर डब्यात जातो असा टोला त्यांनी मुलाखतीवर लगावला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी पालापाचोळा म्हणत असेल तर हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान आहे असा आरोपही आशिष शेलार यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला आहे.
Uddhav Thackeray Interview: करोनावर मात ते शिंदेंची बंडखोरी, पाहा उद्धव ठाकरेंची रोखठोक मुलाखत
“महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व भाजपामुळे आहे. भाजपाला बोलणं, टोमणे मारणं असं केलं तरच यांना महाराष्ट्रात स्थान असेल अशी स्थिती आहे. ही वाईट खोड काही सहजासहजी जाणार नाही,” असं आशिष शेलार म्हणाले आहेत.
“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी पालापाचोळा म्हणत असेल तर हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान आहे. मुख्यमंत्र्यांना घालून पाडून बोलणं, अपमानित करणं हे महाराष्ट्राला मान्य नाही. यावर सुप्रिया सुळे काही बोलणार आहेत का? हा महाराष्ट्रद्रोह होत नाही आहे का?,” अशी विचारणा त्यांनी केली आहे.
पुढे ते म्हणाले “उद्धवजी तुम्ही सतेत असताना जसे वागलात, तसे आम्ही अजिबात वागणार नाही. तुम्ही मुख्यमंत्री असताना जो तुम्हाला प्रश्न विचारेल त्याच्या घरात घुसून तुम्ही मुंडण करत होतात. जो सोशल मीडियावर तुम्हाला अनपेक्षित गोष्टी बोलेल त्यांचे डोळे फोडले होते. जे पत्रकार, संपादक सरकारी धोरणाविरोधात बोलले, त्यांना घरातून अटक केली आहे. आज आम्ही असे वागणार नाही. पण तुम्ही जर आज मुख्यमंत्री असता आणि कोणी तुमचा सामनाच्या मुलाखतीत आहे तसा उल्लेख केला असता, तर तुमचे लवंडे, कार्यकर्ते कसे वागला असता याचा विचार करा”.