Chandrakant Patil on Uddhav Thackeray : राज्यात विधानसभा निवडणुकीचे अत्यंत धक्कादायक निकाल समोर येत आहेत. भाजपाने आतापर्यंत १२५ चा आकडा पार केला असून महायुतीने १२२ चा आकडा पार केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीची लाट आली आहे. दरम्यान, सत्तेच्या जवळ जात असतानाच भाजपाने आता त्यांचा जुना मित्रपक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला साद घातली आहे. भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. ते एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महायुतीचा निकाल स्पष्ट होत असताना उद्धव ठाकरेंना सोबत घेणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, महायुतीला आता २२२ पेक्षा जास्त मिळाल्या आहेत. तर १० अपक्षांपैकी ७ जण आमच्यासोबत येतील. त्यामुळे आम्हाला जागा कमी पडत नाहीत. परिणामी उद्धव ठाकरेंच्या साथीने महायुतीची सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न होण्याचा प्रश्नच येत नाही. पण उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेतला तर, किंवा त्यांना जाणवलं की ते त्यांचं नैसर्गिक जग नाहीय, तर त्याबाबत आमचे शीर्ष नेतृत्त्व निर्णय घेतील.”

हेही वाचा >> Maharashtra Election Winner Candidate List: देवेंद्र फडणवीस विजयी, वाचा संपूर्ण २८८ मतदारसंघांमधील निकालाची यादी!

“२०१९ ला लोकांनी कल दिलेला असतानाही त्यांनी वेगळी वाट पकडली. याचं अनेकांसहीत मलाही दु:ख झालं. २०१४ ते २०१९ च्या काळात भाजपा आणि शिवसेनने महाराष्ट्राचं भलं केलं. तसंच भलं २०१९ ला झालं असतं. मग आज हे निकालही पाहायची गरज पडली नसती. मला वाटतं की शरद पवारांनी उमेदवारही उभे केले नसते”, असही चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील आघाडीवर आहेत. ते जवळपास ३३ हजार मतांनी पुढे आहेत. त्यामुळे त्यांचाही विजय निश्चित मानला जात आहे.

कुछ तो गडबड है – संजय राऊत

“माझ्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला. कुछ तो गडबड है, एकनाथ शिंदे यांना ५६ जागा कोणत्या भरोशावर मिळतात? अजित पवारांना ४० पेक्षा जास्त जागा कोणत्या भरोशावर मिळतात? मग देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी असे कोणते दिवे महाराष्ट्रात लावले की त्यांना २० पेक्षा जास्त जागा मिळतात? महाराष्ट्रातील वातावरण आणि राज्यातील जनता कल ज्या पद्धतीने होता, राज्यभर आम्ही फिरलो, आम्हाला जनतेचा कल माहिती आहे. हा निकाल लोकशाहीचा कौल मानण्याची जी पंरपरा आहे ती आम्ही पाळली. आम्ही लोकशाहीचा कौल मानतो. पण हा कौल कसा मानावा? हा प्रश्न या राज्यातील जनतेला पडलेला आहे”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ताजी अपडेट

विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला असून महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. महायुतीला २३५ जागा मिळाल्या असून ते सत्तास्थापनेसाठी सज्ज आहेत. महायुतीतील सर्वच मित्रपक्षांना जवळपास ९० टक्के जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत फुल स्वींगमध्ये हा निकाल लागला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp asking shivsena uddhav thackeray maharashtra assembly election result 2024 sgk