राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ८ वे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत पार पडले. या अधिवेशनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे देशभरातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. या अधिवेशनात लावण्यात आलेल्या एका गाण्यावरून भाजपाने राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. तसेच, राज्यात महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि गुणगान मात्र शहंशाहचे, असा टोलाही भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना लगावला आहे.

राष्ट्रवादीच्या अधिवेशनात अज़ीम-ओ-शान शहंशाह हे गाणं लावण्यात आलं होते. त्यावरून भाजपाने ट्विट करत खोचक टीका केली आहे. “दिल्लीमधली ‘शहंशाह’ हीच खरी ओळख आहे, शरद पवार यांची. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवर शहंशाहचे गुणगान होत आहे. राज्यात महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि गुणगान मात्र शहंशाहचे,” असे ट्विट महाराष्ट्र भाजपाने केलं आहे.

“दिल्लीच्या तख्यातसमोर न झुकून…”

दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनात शरद पवार यांची पुन्हा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर शरद पवारांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “शिवाजी महाराजांचा इतिहास जर तुम्ही पाहिलात, तर त्यांनी एक गोष्ट आपल्या सर्वांसमोर मांडली आहे आणि ती म्हणजे, दिल्लीच्या तख्तासमोर न झुकून त्यांनी स्वाभिमानाचा परिचय दिला आहे. आज आपण एका ऐतिहासिक मैदानात दिल्लीच्या तालकटोरा मैदानात जमलेलो आहोत. याच ठिकाणाहून पेशव्यांनी दिल्लीच्या शासनाला आव्हान दिलं होतं. मला आनंद आहे की दिल्लीच्या तख्ताला जिथून आव्हान दिलं गेलं होतं, त्या ठिकाणी आज आपलं अधिवशेन आयोजित करण्यात आलेलं आहे,” असं शरद पवार म्हणाले.

Story img Loader