इफ्फी चित्रपट महोत्सवाच्या ज्युरीचे अध्यक्ष नदाव लापिड यांनी केलेल्या एका विधानामुळे ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत असून, वाद निर्माण झाला आहे. लापिड यांनी ‘काश्मीर फाइल्स हा चित्रपट अत्यंत बटबटीत आणि प्रचारपट आहे,’ अशा शब्दांत टीका केली आहे. यानंतर फक्त बॉलिवूडच नव्हे तर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही लापिड यांच्या वक्तव्याशी सहमती दर्शवली होती. दरम्यान भाजपा नेत्याने यावरुन त्यांना टोला लगावला आहे.
आव्हाड नेमकं काय म्हणाले होते?
“तो इस्रायली असल्याने मुस्लीमविरोधी ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपट चालवून घेईल अशी सरकारची अपेक्षा होती. पण “प्रचारकी आणि गलिच्छ” चित्रपट म्हणून मुख्य परीक्षक नदव लॅपिड यांनी सणसणीत चपराक लगावली,” अशी प्रतिक्रिया आव्हाड ट्वीट करत दिली होती.
अतुल भातखळकरांची टीका
जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला अतुल भातखळकर यांनी उत्तर दिलं आहे. “काश्मीर फाइल्सवर अश्लीलतेचा आरोप करणारे इफ्फीचे यावर्षीचे मुख्य ज्युरी नदव लॅपिड हे विकृत मानसिकतेचे म्हणून त्यांच्या देशात, इस्त्रायलमध्ये ओळखले जातात. थोडक्यात म्हणजे, ते इस्त्रायलमधले जितेंद्र आव्हाड आहेत,” असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
इफ्फीचे ज्युरी हेड नेमकं काय म्हणाले?
“काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण विचलित आणि त्रस्त आहोत. हा चित्रपट आम्हाला घाणेरडा तसंच प्रचार करणारा वाटला. इतक्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवणं योग्य नाही. मी माझ्या भावना या मंचावर मोकळेपणाने मांडू शकतो. ही चर्चा होणं गरजेचं आहे. मनात कोणतीही शंका न ठेवता ही चर्चा होणं कलेसाठी गरजेची आहे,” असं नदाव लापिड म्हणाले.
‘काश्मीर फाइल्स’ प्रकरणी इस्रायलचा माफीनामा; लापिड यांनी केलेली टीका वैयक्तिक : राजदूत
इस्रायलचा माफीनामा; लापिड यांनी केलेली टीका वैयक्तिक – राजदूत
लापिड यांनी केलेल्या टीकेनंतर काश्मीर फाइल्सचे मुख्य कलाकार अनुपम खेर, निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी जोरदार आक्षेप घेतला. दरम्यान नदाव लापिड यांनी केलेली टिप्पणी हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचं इस्त्रायलचे मध्य-पश्चिम भारतातील राजदूत कोब्बी शोशानी यांनी म्हटलं आहे. लापिड यांच्या विधानामुळे भारत-इस्रायल संबंधांना धक्का बसला असला तरी या वादामुळे उलट दोन्ही देश अधिक जवळ येतील असा दावा त्यांनी केला.