राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून सातत्याने करोना परस्थितीच्या हाताळणीवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरीच बसून कारभार पाहात असल्याचा मुद्दा विरोधकांकडून वारंवार उपस्थित केला जात आहे. तौते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अधिक वेळ कोकणात घालवायला हवा होता, अशी देखील टीका विरोधकांकडून केली जात असताना आता त्याच मुद्द्याला धरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर आणि विशेषत: पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. सामना वृत्तपत्रात छापून आलेली एक बातमी शेअर करून “मालकाच्या कर्तृत्वाचे असे जाहीर पोतेरे करू नये”, असा खोचक सल्ला अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना टॅग करून दिला आहे.
काय आहे सामनाच्या बातमीत?
ओडिशा आणि पश्चिम बंगालला तडाखा बसलेल्या यास चक्रीवादळादरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मंगळवारी रात्रभर मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षात थांबल्या होत्या. त्यासाठी ममता बॅनर्जी यांचं कौतुक करणारी ही बातमी छापून आल्यानंतर अतुल भातखळकर यांनी त्याचा फोटो शेअर करत संजय राऊतांना टोला लगावला आहे.
“संजय राऊतांचा उद्धवजींवर राग”
“संजय राऊतांचा काय राग आहे कोण जाणे उद्धवजींवर. तौते वादळाच्या काळात उद्धव ठाकरे घरी दडी मारून बसलेले होते हे सांगण्याची काय तऱ्हा आहे पाहा. सामनाची बातमी…यास वादळाचा धोका, ममता रात्रभर मंत्रालयात ठाण मांडणार. मालकाच्या कर्तृत्वाचे असे जाहीर पोतेरे करू नये”, असं भातखळकर या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
संजय राऊतांचा काय राग आहे कोण जाणे उद्धवजींवर. तौक्ते वादळाच्या काळात @OfficeofUT घरी दडी मरून बसलेले हे सांगण्याची काय तऱ्हा आहे पाहा…
सामानाची बातमी…
‘यास वादळाचा धोका, ममता रात्रभर मंत्रालयात ठाण मांडणार.’मालकाच्या कर्तृत्वाचे असे जाहीर पोतेरे करू नये.@rautsanjay61 pic.twitter.com/7Hda1T7EUw
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 26, 2021
“वडिलोपार्जित कंपन्यांसारखे सरकार चालवू नका,” भाजपा नेता रोहित पवारांवर संतापला
गेल्या काही दिवसांपासून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर सातत्याने टीका केल्यामुळे त्यांच्यात आणि शिवसेनेत्या नेत्यांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे.