Har Har Mahadev Movie Screening Controversy: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईचं भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी स्वागत केलं आहे. अत्यंत योग्य आणि स्वागतार्ह कारवाई असल्याचं त्यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना म्हटलं. राज्यात कोणीही कायदा हातात घेऊ शकत नाही, कायद्याप्रमाणे वागावं लागेल हे आव्हाडांनी लक्षात ठेवावं अशी सल्लावजा सूचनाही त्यांनी केली.
ठाण्यातील विवियाना मॉल येथे ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा खेळ सोमवारी जितेंद्र आव्हाड यांनी बंद पाडला होता. या घटनेदरम्यान, एका प्रेक्षकाला धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते. त्यानंतर प्रेक्षकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे आव्हाड यांच्यासह १०० जणांविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी आव्हाड यांना याप्रकरणात अटक करण्यात आली.
यावर प्रतिक्रिया देताना अतुल भातखळकर यांनी सांगितलं की “अत्यंत योग्य आणि स्वागतार्ह कारवाई आहे. सार्वजनिक ठिकाणी जाऊन गोंधळ घालणं, लोकांना मारहाण करणं योग्य नाही. चित्रपटावर आक्षेप होता तर सेन्सॉर बोर्ड किंवा पोलिसांकडे तक्रार करता आली असती. पण स्वत: लोकप्रतिनिधी असताना कायदा हातात घेणं ही आव्हाडांची जुनी खोड आहे”.
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांना अटक
अतुल भातखळकरांनी ट्विटही केलं असून ‘जित्याची खोड पोलिसांचे दंडूके पडल्याशिवाय जात नाही’ असा टोला लगावला आहे.
“मंत्री असतानाही त्यांनी अशीच मारहाण केली होती. त्यावेळी हायकोर्टात दाद मागितल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. पण यावेळी हायकोर्टात जाण्याची वेळ आली नाही कारण राज्यात सक्षम, कार्यक्षम सरकार आहे,” असंही त्यांनी सांगितलं.
“राज्यात कोणीही कायदा हातात घेऊ शकत नाही. कायद्याप्रमाणे वागावं लागेल हे आव्हाडांनी लक्षात ठेवावं. पण त्यांनी हे उद्योग का केले हे अधिक महत्त्वाचं आहे. चित्रपटात अफजलखानाचा वध केल्याचं दृश्य दाखवलं याची खदखद त्यांच्या मनात होती. म्हणूनच त्यांनी चित्रपटाला विरोध केला होता तसंच नाराजी व्यक्त केली होती, आव्हाडांचं खरं रुप सर्वांसमोर आलं आहे. त्यांचा जातीयवादी, धार्मिक, असंसकृत चेहरा सर्वांना दिसला आहे,” अशी टीका त्यांनी केली आहे.
“मतांची पोळी भाजण्याचा निंदनीय प्रकार आव्हाड आणि त्यांचा पक्ष वारंवार करत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि देशाचा इतिहास बदलण्याचा ते प्रयत्न करत असतात. पण आता हे सहन केलं जाणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं,” अशा इशारा भातखळकरांनी दिला आहे.