राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमधला कलगीतुरा संपण्याचं नाव घेत नाहीये. आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू असतानाच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राजकारण चांगलंच तापलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतला मोठा गट फुटल्यानंतर एकीकडे उद्धव ठाकरेंकडून पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी प्रयत्न केले जात असताना भाजपाकडून त्यांना लक्ष्य केलं जात आहे. आता तर भाजपानं उद्धव ठाकरेंना थेट विधिमंडळात येण्याचं आव्हान दिलं आहे.
भाजपाचे कांदिवली पूर्वमधील आमदार अतुल भातखळकर यांनी आज सकाळी केलेल्या ट्वीटमधून उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. राजीनाम्याची घोषणा करून देखील उद्धव ठाकरेंनी अद्याप राजीनामा न दिल्याचा मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, उद्धव ठाकरेंना विधिमंडळात येण्याचं आव्हान दिलं असून या मुद्द्यावरून आता दोन्ही बाजूंनी पुन्हा एकदा कलगीतुरा रंगण्याची चिन्ह दिसत आहेत.
काय म्हणाले भातखळकर?
अतुल भातखळकर यांनी ट्वीट करून उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदारांना केलेल्या सूचनेचा उल्लेख केला आहे. “शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सभागृहात आक्रमक भूमिका घ्या, प्रश्नांना वाचा फोडा; उद्धव ठाकरेंच्या आमदारांना सूचना…उध्दव जी,आपणही राजीनाम्याची घोषणा करून राजीनामा न दिलेले विधान परिषदेतील आमदार आहात. मातोश्रीवर बसून शेळ्या कसल्या हाकता? या विधिमंडळात आणि फोडा वाचा”, असं आव्हानच भातखळकर यांनी आपल्या ट्वीटमधून दिलं आहे.
“भ्रष्टाचाराच्या पैशांनी मातोश्री भरली”
दरम्यान, विधानभवनाबाहेर माध्यमांशी बोलताना देखील भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. “गेल्या वेळी आमच्याशी लढले, तेव्हाच यांच्या नाकातोंडात पाणी गेलं होतं. देवेंद्र फडणवीसांनी हिंदुत्वासाठी यांचा महापौर बसू दिला. आता तर भाजपा ११० टक्के मुंबई महानगर पालिका जिंकणार आहे. कारण तुम्ही भ्रष्टाचाराच्या पैशांनी मातोश्री भरली आहे. जनता त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही”, असं भातखळकर म्हणाले आहेत.